सातवाहनकालीन जाते कऱ्हाडात, 'ही' आहेत जात्याची वैशिष्ट्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 01:04 PM2021-11-30T13:04:30+5:302021-11-30T13:05:16+5:30

सातारा : कऱ्हाड येथील कृष्णा नदीच्या काठावर असणाऱ्या शिक्षण महर्षी डॉ. बापुजी साळुंखे महाविद्यालयाच्या आवारात सातवाहनकालीन जातं आढळून आलं ...

Satavahan kalin jate to karad | सातवाहनकालीन जाते कऱ्हाडात, 'ही' आहेत जात्याची वैशिष्ट्ये

सातवाहनकालीन जाते कऱ्हाडात, 'ही' आहेत जात्याची वैशिष्ट्ये

Next

सातारा : कऱ्हाड येथील कृष्णा नदीच्या काठावर असणाऱ्या शिक्षण महर्षी डॉ. बापुजी साळुंखे महाविद्यालयाच्या आवारात सातवाहनकालीन जातं आढळून आलं आहे. साताऱ्यातील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांनी मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या माध्यमातून या इतिहासाचा उलगडा केला असून, हे जातं सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचं असावं, असं इतिहास संशोधकांचं मत आहे.

दक्षिण महाराष्ट्राला मोठा प्राचीन इतिहास आहे. या इतिहासाच्या पाऊलखुणा जिल्ह्यातील विविध गावांत आढळून येतात. कोल्हापूर, मिरज आणि कऱ्हाड ही या भागातील प्रमुख शहरं. तत्कालीन प्राचीन व्यापारी मार्गावरील ही गावे होत. या तिन्ही शहरांजवळ बौद्ध लेणी आढळून आली आहेत. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने गेली काही वर्षे या भागातील ऐतिहासिक अवशेष, कोरीव लेख, आदींचा शोध घेतला जात आहे. या अभ्यासादरम्यान नुकतेच मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांना कऱ्हाड येथील डॉ. बापुजी साळुंखे महाविद्यालयाच्या आवारात सातवाहनकालीन जातं आढळून आलं आहे.

प्राचार्य डॉ. सतीश घाटगे आणि इतिहास विभागाचे प्रा. सचिन बोलाईकर यांच्या सहकार्याने या जात्याचा अभ्यास करण्यात आला. साळुंखे महाविद्यालय हे कृष्णा नदीकाठी ज्या भागात आहेत, तो भाग कऱ्हाड शहराचा सर्वांत जुना भाग आहे. या परिसरात आजवर अनेक अवशेष मिळाले आहेत. हे अवशेष एकत्र ठेवण्यात आले आहेत. मात्र, त्यांचा अभ्यास झाला नव्हता. या अवशेषांमध्येच सातवाहन कालीन जातं आढळून आलं आहे. हे जातं सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचं असावं, असं इतिहास संशोधक सांगतात.

जात्याची ही आहेत वैशिष्ट्ये

- हे जातं संपूर्ण दगडी आहे.

- याचा परीघ सुमारे सुमारे तीन फूट इतका आहे.

- या जात्यातील छिद्रात लाकडी दांडकं घालून ते फिरवलं जात असे.

- दक्षिण महाराष्ट्रात असं जातं पहिल्यांदाच आढळून आलं आहे.

- यापूर्वी जुन्नर आणि उस्मानाबाद परिसरात असं जातं आढळलं होतं.

इतिहास दृष्टिक्षेपात...

प्राचीन इतिहास लाभलेल्या कऱ्हाड शहरातील कृष्णा नदीच्या काठावर सातवाहनकालीन जातं आढळून आलं आहे. त्यामुळे या ठिकाणी सातवाहनकालीन वस्ती असल्याचे सिद्ध होते. साळुंखे महाविद्यालयाच्या आवारात वीरगळ, जुन्या मंदिरांचे अवशेष, जुने पाटा-वरवंटा असे अन्य अवशेषही आहेत. त्यांचा अभ्यासही मिरज इतिहास मंडळाचे अभ्यासक करीत असून, कऱ्हाड शहराच्या प्राचीन इतिहासाच्या पाऊलखुणा ते उलगडणार आहेत.

Web Title: Satavahan kalin jate to karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.