‘कृष्णा’चा विनाकपात बत्तीसशे रुपयांचा अंतिम दर-सुरेश भोसले यांची घोषणा :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 10:17 PM2017-09-28T22:17:46+5:302017-09-28T22:19:19+5:30

'Satisfaction of Krishna' final rate of thirty two hundred rupees - Suresh Bhosale announces: | ‘कृष्णा’चा विनाकपात बत्तीसशे रुपयांचा अंतिम दर-सुरेश भोसले यांची घोषणा :

‘कृष्णा’चा विनाकपात बत्तीसशे रुपयांचा अंतिम दर-सुरेश भोसले यांची घोषणा :

Next
ठळक मुद्देवार्षिक सभा खेळीमेळीत;सभासदांना मोफत साखरेसह मिळणार ३ हजार ३०० रुपयांचा लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड : ‘कृष्णेचा कारभार सभासदांनी मोठ्या विश्वासाने आमच्याकडे सुपूर्द केला आहे. अडचणीतील कारखाना गत दोन वर्षांत आम्ही सुस्थितीत आणला. मध्यम मुदतीच्या ५७ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेडही केली आहे. ऊसदरातही कारखाना कोठेही कमी पडणार नाही, असे सांगतानाच ३ हजार २०० रुपयांचा अंतिम दर जाहीर करीत प्रतीमहिना मिळणाºया पाच किलो साखरेचा विचार केल्यास सभासदांच्या उसाला सरासरी ३ हजार ३०० रुपये दराचा लाभ होत आहे,’ अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.

रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. डॉ. सुरेश भोसले अध्यक्षस्थानी होते. पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, कारखान्याचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, संचालक धोंडीराम जाधव, जगदीश जगताप, दयानंद पाटील उपस्थित होते.

डॉ. भोसले म्हणाले, ‘यापूर्वी कारखान्याने २ हजार ९५० रुपये दिले आहेत. त्यात अजून २५० रुपये आपण अंतिम बिल दिवाळीपूर्वी देत आहोत. आम्ही सत्तेत आलो तेव्हा कृषी महाविद्यालय बंद करण्याची नोटीस आली होती. प्रदूषणाच्या कारणास्तव डिस्टिलरी बंद करण्याचीही नोटीस आली होती. अजून दोन वर्षे हा कारखाना त्यांच्या ताब्यात राहिला असता तर कदाचित कारखानाही बंद पडला असता. मात्र, दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या विचारावर प्रेम करणाºया सभासदांनी सत्तांतर घडवून आणले. त्यांच्या विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही.
सत्तेवर आल्यानंतर तोडणी वाहतूकदारांचे २१ कोटी, कर्मचाºयांच्या ग्रॅज्युटीची रक्कम १० कोटीही आम्ही अदा केली आहे. जणू काही ही देणी आम्ही देण्यासाठीच ठेवली होती की काय? असा प्रश्न पडतो. मात्र, साखर कारखानदारी चालविण्याची ही पद्धत योग्य नाही, अशी टीका त्यांनी संस्थापक पॅनेलचे नाव न घेता केली.

आज कृष्णेची खरी गाळप क्षमता ७ हजार ५०० मेट्रिक टन आहे. नजीकच्या काळात ही क्षमता १० हजारांवर नेण्याचा आमचा मानस आहे. ऊसतोडणी कार्यक्रम व्यवस्थित राबविला जावा, म्हणून मोबाईल अ‍ॅपद्वारे फोटो काढून ऊस नोंदणी करण्याचा प्रयोग आपण सुरू केला आहे. त्यामुळे यापूर्वी ऊसतोडणी विभागाचे जे काम संचालक करीत होते ते आता होणार नाही.
खरंतर डिस्टिलरीच्या आधुनिकीकरणाचे काम यापूर्वी अर्धवट झाले होते. त्यातून फायदा झाला नाही. म्हणून डिस्टिलरीचे पूर्ण आधुनिकीकरण येत्या हंगामातच करण्यात येणार आहे. त्याची क्षमता ३० हजार लिटर असणार आहे. तर इथेनॉल निर्मितीचा ३० हजार लिटर क्षमतेचा नवा प्लॅन्ट सुरू केला आहे. दुर्लक्ष केलेल्या बायोगॅस प्रकल्पाची दुरुस्ती केली असून, त्या गॅसमधून ३२ लाख घनमीटर गॅस आता तयार होईल. त्याबरोबरच ८० टन बगॅसची बचत होईल, अशी माहितीही डॉ. सुरेश भोसले यांनी यावेळी दिली.

डॉ. अतुल भोसले म्हणाले, ‘दिवंगत जयवंतराव भोसले कारखान्याचे सलग तीस वर्षे अध्यक्ष असताना त्यांनी सलग २२ वर्षे राज्यात एक नंबरचा ऊसदर दिला. त्यामुळे कृष्णेला वेगळा इतिहास आहे. त्यानंतर मात्र कारखानदारीत राजकारण घुसल्याने कृष्णा कारखान्याची वार्षिक सभा म्हणजे वादावादीची सभा असे समीकरण तयार झाले होते. आज मात्र विनागोंधळाची ही सभा पार पडली. हा क्षणसुद्धा सुवर्णाक्षराने लिहावा लागेल, अशी टिपण्णी त्यांनी केली.सभेला भोसलेंच्या पाठीशी असलेले मदनदादा, कट्टर विरोधक असलेले अविनाशदादा आणि सुरक्षित अंतरावर असलेले इंद्रजितबाबा हे तिघेही अनुपस्थित होते. सभेचे कामकाज काही मिनिटांत सर्व विषय एकमताने मंजूर करीत पार पडले. त्यानंतर डॉ. अतुल भोसले व डॉ. सुरेश भोसले यांनी मार्गदर्शन केले.


एक बाटलीही शिल्लक राहत नाही!
कृष्णा कारखान्याने यावर्षी जिवाणू खतांची लॅब तयार केली आहे. येथे ५० हजार लिटर जिवाणू खते तयार होतात. त्याला मागणी चांगली असून, त्याची एक बाटलीही शिल्लक राहत नाही, असे सांगतानाच कृष्णेच्या मातीत काहीतरी वेगळा गुणधर्म आहे. आपल्या कारखान्यावर लिकरसुद्धा तयार होते. त्याची बाटलीही कधी शिल्लक राहत नाही. मध्यंतरी दारू दुकाने बंद होती. तरीसुद्धा कृष्णेची लिकर नेहमीपेक्षा जास्त खपली, असे सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

अहवाल न समजणारेच वाचतात
खरंतर प्रत्येक ऊस उत्पादक सभासदाने कारखान्याचा वार्षिक अहवाल नीट वाचून समजून घेतला पाहिजे. मात्र, बहुतांशी सभासद तो वाचतच नसल्याचे दिसते. याउलट ज्यांना अहवालातील काही समजत नाही तेच लोक अहवाल वाचतात. आणि नको ते प्रश्न, शंका उपस्थित करतात, असे डॉ. सुरेश भोसले म्हणताच अनेकांनी हसून दाद दिली.
 

सल्लागारांचे ऐकल्यानेच तोटा
साखर कारखान्यातील स्पर्धा ओळखून यापूर्वीच्या सत्ताधाºयांनी खरंतर पावले टाकायला हवी होती. काही सुधारणा करायला हव्या होत्या. नियोजन आराखडा तयार करायला हवा होता. मात्र, त्यांचे सल्लागार सांगतील, तसेच ते वागले. आणि त्याचा तोटा कारखान्याच्या सर्वसामान्य सभासदांना बसला. त्यासाठी सल्लागार चांगले असावे लागतात, असा चिमटाही डॉ. सुरेश भोसले यांनी यावेळी काढला.

Web Title: 'Satisfaction of Krishna' final rate of thirty two hundred rupees - Suresh Bhosale announces:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.