सातारकर म्हणे... ‘लिफ्ट’ नको, चालतच जाऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 11:47 PM2018-12-16T23:47:02+5:302018-12-16T23:47:07+5:30
जगदीश कोष्टी। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : बहुतांश शासकीय कार्यालये, रुग्णालयांमध्ये लिफ्टची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे ज्येष्ठ ...
जगदीश कोष्टी।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : बहुतांश शासकीय कार्यालये, रुग्णालयांमध्ये लिफ्टची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, विकलांग मंडळींनाही विनासायास एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाता येऊ लागले; पण व्यवस्थित निगा राखली जात नसल्याने मध्येच अडकून राहणे, अचानक खाली कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ‘लिफ्ट नको’ म्हणण्याची वेळ सातारकरांवर आली आहे.
सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा परिषदेमधील लिफ्टमध्ये बिघाड झाल्याने मध्येच थांबणे, त्यामध्ये नागरिक अडकण्याच्या घटना घडल्या आहेत. शनिवारी एका खासगी रुग्णालयामध्ये तर कहरच झाला. लिफ्टचे नियंत्रण सुटल्याने ती खाली कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झाली नाही. यामुळे लिफ्टच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
वाढती लोकसंख्या अन् शहरीकरणामुळे साताºयात बहुमजली इमारतींचे प्रमाण वाढले आहे. बदलत्या नियमावलीनुसार तीनहून अधिक मजल्यांच्या इमारतींमध्ये लिफ्टची सक्ती केली आहे. बांधकाम व्यावसायिकही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दिल्या जाणाºया सुविधांमध्ये लिफ्ट दाखवितात.
बांधकाम करत असतानाच जिन्याच्या शेजारीच लिफ्टसाठी डक ठेवला जातो. त्यामुळे आज ना उद्या लिफ्ट येईल, याचा विचार करून अनेक ठिकाणी फ्लॅटची विक्री होते; पण कित्येक वर्षे लिफ्ट बसत नाही. अशा रिकाम्या जागेतून लहान मुले पडण्याचा धोका सर्वाधिक
असतो.
विशेष म्हणजे, लिफ्टची जबाबदारी दिलेल्या कंपनीचे कर्मचारीही याबाबत बिनधास्त असल्याचे पाहायला मिळतात. फ्लॅटधारकांशी वाद घालतील; पण अपघात घडू नयेत म्हणून उपाययोजना करण्याबाबत उदासिनता दाखवितात.
शासकीय कार्यालये, दवाखान्यांमध्ये लिफ्ट चालविण्यासाठी कर्मचारी
असतो. त्यांना योग्य ते प्रशिक्षण असल्यामुळे लिफ्ट अडकलीच तर आतील नागरिकांना ते धीर देऊ
शकतात. योग्य त्या ठिकाणी निरोप देऊन मदत मागावू शकतात; पण खासगी इमारतीत अशा घटना खडल्यास महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांमध्ये भीतीचे
वातावरण निर्माण होते. त्यामुळे लिफ्ट नको रे बाबा... चालत गेलेलं बरं म्हणण्याची वेळ सातारकरांवर आली आहे. लिफ्टच्या देखभालीसाठी एखाद्या कंपनीला करार केला जातो. कामाचा करार होईपर्यंत सर्वचजण गोडगोड बोलतात पण त्यानंतर कोणीही फिरत नसल्याचा अनुभव अनेकदा येत असतो.
अत्याधुनिक उपकरणांचा अभाव
अनेक ठिकाणी केवळ लिफ्ट असते; परंतु बॅटरी बॅकअप नसल्याने वीज गेल्याबरोबरच त्या जागेवर थांबतात. तसेच एखाद्याकडून दरवाजा सुरू राहिलाच तर सूचना करणारी यंत्रणा असते; पण ती बसवलेलीच नसते. एखाद्या मजल्यावर लिफ्ट अर्धवट उघडी असल्यास ती खाली किंवा वर जात नाही. अत्याधुनिक यंत्रणाच नसल्याने वापरण्यात अडथळे येतात.