सातारकर की वाईकर; आज होणार फैसला
By admin | Published: July 7, 2017 11:23 PM2017-07-07T23:23:23+5:302017-07-07T23:23:23+5:30
सातारकर की वाईकर; आज होणार फैसला
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राष्ट्रवादी युवक काँगे्रसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोघांचेही निष्ठावंत कार्यकर्ते या पदासाठी प्रबळ दावेदार आहेत. या पदावर सातारकर की वाईकराला संधी मिळणार, याबाबत उत्सुकता आहे. खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत एका नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
एका कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे नेते खासदार शदर पवार शनिवारी साताऱ्यात येणार आहेत. या कार्यक्रमानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेत बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा होणार असून, युवक अध्यक्ष निवडीबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी या पदासाठी वयाची अट ३२ इतकी ठरवून टाकली असल्याने पक्षसंघटनेत यापूर्वी काम केलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची संधी हुकल्यात जमा असल्याचे बोलले जात आहे. वयाच्या अटीत बसणाऱ्या दोघांतच कुणाला निवडायचे, यावरून राष्ट्रवादी नेत्यांमध्ये काही दिवसांपासून खल सुरू आहे.
सातारा नगरपालिकेचे नगरसेवक यांना हे पद मिळावे, यासाठी
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पक्षाकडे शब्द टाकला आहे. तर
माजी मंत्री दिवंगत मदनआप्पा
पिसाळ यांचे नातू व जिल्हा
परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ व माजी कृषी सभापती शशिकांत पिसाळ यांचे चिरंजीव विजयसिंह पिसाळ यांना संधी देण्यासाठी आमदार मकरंद
पाटील यांनी पक्षाकडे शब्द टाकला आहे.
नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी याआधी युवकचे
शहराध्यक्ष म्हणून काम केले आहे. ‘डॅशिंग’ कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. आंदोलनाला आक्रमक स्वरुप देण्याचा हातखंडा खंदारे यांच्याकडे आहे. तसेच कोणता विषय ‘इश्यू’ करायचा, याचा अनुभवही त्यांना आहे. पालिका निवडणुकीनंतर आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी शहरामध्ये आक्रमक राजकारणाला महत्त्व दिले आहे. आगामी काळात आक्रमक होऊनच राजकारण करावे
लागेल, असे बाबाराजे पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये वारंवार ठासून सांगत असतात. आक्रमक राजकारणासाठी खंदारे हे नाव ‘फिट्ट’ ठरू शकेल असे आहे. याउलट बावधनचे अॅड. विजयसिंह पिसाळ यांनी वाई
शहरात युवकांची मोट बांधण्याचे काम सुरू केले आहे. बावधनच्या पिसाळ घराण्याचे राजकीय वलय त्यांच्याभोवती आहे. त्यांना पक्षसंघटनेत संधी देऊन मदनआप्पांची तिसरी पिढी पक्ष कार्यात सक्रिय करण्याची संधी राष्ट्रवादीचे नेते शोधत आहेत.
राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी युवक काँगे्रसच्या पदाधिकारी निवडी होऊ शकल्या नाहीत. इच्छुकांची संख्याच
जास्त. त्यामुळे नाराज कुणाला करायचे? एकमत झाल्यावर निवडी करू, असे ठरले आहे. पक्षाने यापूर्वी हे अध्यक्षपद निवडताना कार्यकर्त्याच्या कामाला महत्त दिले आहे.
सातारा जिल्हा गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी कॉँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने पक्ष संघटनेत काम केलेल्या कार्यकर्त्यांच्या आकांक्षा वाढल्या आहेत. यातूनच युवकच्या जिल्हाध्यक्षपदासाठी तब्बल १३ जणांनी मुलाखती दिल्या आहेत. वयाच्या अटीमुळे बरेचजण आधीच ‘आऊट’ झाले आहेत.
अतुल शिंदेंकडे जुनीच जबाबदारी
राष्ट्रवादी विद्यार्थी काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे यांनी युवक जिल्हाध्यक्षपदासाठी मुलाखत दिली होती. मात्र, त्यांना विद्यार्थी काँगे्रसच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा संधी दिली गेली आहे. त्यामुळे त्यांचे नाव स्पर्धेतून बाजूला पडले आहे.
वयाची अट वाढवली तर यांनाही संधी
युवक जिल्हाध्यक्षपदासाठी ३२ ही वयाची अट आहे. ती वाढवून ३५ केली तर औद्योगिक सेलचे माजी जिल्हाध्यक्ष पारिजात दळवी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँगे्रसचे माजी जिल्हाध्यक्ष विजय कुंभार, गोरखनाथ नलवडे, दीपक थोरात यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.