सातारकरांना समजेना पाण्याचं महत्त्व !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:34 PM2019-04-12T23:34:35+5:302019-04-12T23:34:43+5:30
सचिन काकडे। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : माण, खटाव तालुक्यांतील अनेक गावे पाण्यासाठी संघर्ष करीत असताना सातारा शहरात मात्र ...
सचिन काकडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : माण, खटाव तालुक्यांतील अनेक गावे पाण्यासाठी संघर्ष करीत असताना सातारा शहरात मात्र या उलट चित्र दिसू लागले आहे. शहरवासीयांना पालिकेकडून मुबलक पाणीपुरवठा केला जात आहे; परंतु अनेक नागरिकांकडून पाण्याचा अपव्यय केला जात आहे. बहुतांश नळांना तोट्याच नसल्याने पाण्याची नासाडीही मोठ्या प्रमाणात होत
आहे.
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात दुष्काळ तर पश्चिमेकडे सुकाळ असा विरोधाभास आजही पाहावयास मिळतो. पश्चिमेकडील सातारा, वाई, जावळी, महाबळेश्वर, पाटण हे पर्जन्यवृष्टीचे तालुके म्हणून ओळखले जातात. तर पूर्वेकडील माण, खटाव, कोरेगाव, फलटण या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. पश्चिमेकडील कण्हेर, उरमोडी, धोम-बलकवडी या धरणांमुळे दुष्काळी भागाचा पाणीप्रश्न काहीअंशी मार्गी लागतो.
उन्हाळा सुरू झाल्यापासून माण, खटाव तालुक्यांतील जनतेची पाण्यासाठीची धडपड सुरू झाली आहे. मात्र, पश्चिमेकडे या उलट चित्र दिसू लागले आहे. सातारा शहराला कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागांना पहाटे, सकाळी व सायंकाळी अशा तीन टप्प्यांत पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळ्यात पाण्याचा काटकसरीने वापर करण्याऐवजी नागरिकांकडून याचा अपव्यय केला जात आहे. इमारतींवर असलेल्या पाण्याच्या टाक्यात तुडुंब भरून वाहत असल्याचे चित्र नेहमीच नरजेस पडत आहे. अनेक नळांना तोट्याच नसल्याने पाण्याची नासाडी होत आहे. नळ सुरू ठेवून कपडे धुणे, गाड्या धुणे, दुकानांच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पाणी शिंपडणे अशा माध्यमातून नागरिक पाण्याची नासाडी करू लागले आहेत.
पालिकेच्या वतीने यापूर्वी तोट्या नसलेले नळ कनेक्शन बंद करण्यात आले होते. परंतु अलीकडे ही कारवाई पूर्णपणे बंद झाली आहे. अनेक नळांना तोट्या नसल्याने पाण्याची नासाडी होत असताना पालिकेचेही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. पालिकेने ही बाब गांभीर्याने घ्यावी, तोट्या नसलेल्या नळ कनेक्शनवर कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
पाणी बचतीसाठी आपण हे करू शकतो..
नळाखाली कपडे, भांडी धुणे टाळावे.
अंघोळीसाठी शॉवरऐवजी बादलीत पाणी घ्यावे.
कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन दैनंदिन वापर टाळावा.
आपली वाहने धुण्यासाठी पाईपने वाहते पाणी वापरू नका.
नळांना एरिएटर बसवून घ्या. त्यानेही भरपूर पाणी वाचते.
परसबागेत पाण्यासाठी छोट्या बाटल्यांचा उपयोग करावा.