तोडफोडीनंतर तिसऱ्या दिवशीही साताऱ्यातील दवाखाना बंद
By admin | Published: June 22, 2017 01:48 PM2017-06-22T13:48:04+5:302017-06-22T13:48:04+5:30
हलगर्जीपणा केल्याचा गुन्हा डॉक्टरांवर दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी
आॅनलाईन लोकमत
सातारा , दि. २२ : शहापूर ता. सातारा येथील शरद शंकर सकटे (वय १९) याचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी समर्थ मंदिर येथील शिंदे हॉस्पीटलची तोडफोड केली होती. या प्रकरणामुळे तिसऱ्या दिवशीही हे रुग्णालय बंद असून संबंधित नातेवाईकांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
शहापूर येथे राहणाऱ्या शरद सकटे याला मंगळवारी छातीत दुखत असल्याच्या कारणावरून समर्थ मंदिर येथील शिंदे हॉस्पीटलमध्ये आणण्यात आले होते. या ठिकाणी डॉ. संजय शिंदे अनुपस्थित असल्याने त्यांच्या पत्नीने शरद सकटे याचा इसीजी काढत गोळ्या औषधे लिहून देऊन घरी नेण्याचा सल्ला कुटुंबियांना दिला.
घरी नेल्यानंतर काहीवेळानंतर तो बुशुद्ध पडला. त्याला तत्काळ साताऱ्यातील खासगी दवाखान्यात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. शिंदे हॉस्पीटलमध्ये योग्य निदान न झाल्याने तसेच त्याबाबतची औषधे योग्य पद्धतीने न दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली होती. त्यामुळे समर्थ मंदिर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे हे रुग्णालय तिसऱ्या दिवशीही बंदच आहे.
दरम्यान, पोलिसांनी या रुग्णालयाची तोडफोड केल्याप्रकरणी अज्ञात युवकांवर गुन्हा दाखल केला आहे.