मंत्रिपदासाठी साताऱ्याचा मार्ग खुला!
By admin | Published: June 28, 2016 11:14 PM2016-06-28T23:14:45+5:302016-06-28T23:15:46+5:30
जिल्हावासीयांना अपेक्षा : मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला उधाण
सातारा : राज्यात पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होणार, या चर्चेला उधाण आले आहे. आता तरी साताऱ्यात मंत्रिपदाच्या रूपाने लालदिवा मिळणार का?, अशी चर्चाही जिल्ह्यात रंगू लागली आहे. किमान एक हक्काचा लालदिवा साताऱ्याला मिळाला तर पालकमंत्र्यांची भासणारी कमतरता यानिमित्ताने भरून निघेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
राज्यातील आघाडीची सत्ता गेल्यानंतर जिल्ह्याचे हक्काचे मंत्रिपदही हिरावून घेतले गेले. महायुतीच्या सत्तेच्या काळात साताऱ्यात आपले प्राबल्य वाढविण्यासाठी भाजप मंत्रिपदाच्या निमित्ताने प्रयत्न करेल, असे वाटत होते; परंतु याबाबत भाजपने अद्याप पाऊल टाकलेले नाही.
भाजपचा मित्र पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना विधान परिषदेच्या माध्यमातून आमदारकी मिळालेली आहे. आता या आमदारकीचे रूपांतर मंत्रिपदात केले जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मंत्रिपदासाठी कुणाच्या दारात भीक मागायला जाणार नाही, असे स्पष्ट वक्तव्य आ. महादेव जानकर यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. आता भाजपच त्यांची वर्णी मंत्रिपदावर करून त्यांची नाराजी दूर करेल काय, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिमंडळात नव्याने कोणाचा समावेश होणार?, याबाबतची चर्चा सुरू आहे. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना बढती देऊन महसूलमंत्री केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे हे जिल्ह्याचे पालकमंत्री असले तरी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील हेच साताऱ्यात जास्त काळ असतात. पालकमंत्र्यांना साताऱ्यात यायला वेळ मिळत नसल्याने जिल्ह्याला स्वतंत्र मंत्रिपद देऊन भाजप शिवसेनेवर यानिमित्ताने खेळी करू शकतो.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी पालकमंत्री विशेष काही हालचाल करत नसतील रासपला बळ देण्यासाठी भाजपही उत्सुक आहे. राष्ट्रवादी व काँगे्रस या दोन प्रबळ पक्षांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठीही भाजप ही चाल खेळू शकतो.
सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर येथे जानकर लवकरच मंत्रिमंडळात दिसतील, असे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर आमदार जानकर यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशासाठी त्यांचेही प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)
नियोजन भवनानंतर थेट मंत्रिमंडळात!
विधान परिषदेतर्फे आमदारकी मिळाल्यानंतर महादेव जानकर यांना जिल्ह्याच्या नियोजन भवनात प्रवेश मिळाला. आता मंत्रिपदाच्या माध्यमातून ते थेट मंत्रिमंडळात जाण्याची शक्यता आहे.