साताऱ्याच्या क्षितिजावर सप्तरंग
By Admin | Published: March 11, 2015 10:48 PM2015-03-11T22:48:55+5:302015-03-12T00:08:22+5:30
रंगपंचमी उत्साहात : शहरात बच्चेकंपनी, तरुणाई अन् ज्येष्ठांनीही साजरा केला रंगोत्सव--रंग उमलत्या मनाचा...रंग उसळत्या हर्षाचा...रंग बेधुंद मस्तीचा... रंग चिरंतन सलोख्याचा...
सातारा : रंग आणि उत्साहाचा सण म्हणून रंगपंचमी सर्वत्र साजरी केली जाते. साताऱ्यात यंदा तरुणाईचे, माणुसकीचे अन् सहिष्णूतेचे रंग पाहायला मिळाले.
पारंपरिक उत्साहात सकाळपासूनच रंगपंचमीचा धडाका सुरू झाला होता. महाविद्यालयीन युवकांनी सकाळपासूनच रंग खेळण्यास सुरुवात केली होती. डोक्यात अंडे फोडून तर पाण्याच्या डबक्यात परस्परांना डुंबवण्यापर्यंत त्यांनी धुडगूस घातला. त्या तुलनेत युवतींनी महाविद्यालयात कोरडे रंग परस्परांना लावून हा सण साजरा केला. तरुणाईचा हा रंग पाहून सर्वांनाच ऊर्जा मिळाली.
रंगांचा हा उत्सव साजरा करताना गरीब, श्रीमंत असा भेदभाव राहत नाही. म्हणूनच आपल्या परीने मिळेल तो रंग परस्परांना लावून झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या चिमुरड्यांनीही त्यांच्या परीने हा सण साजरा करून आनंद लुटला. त्यांना आनंदाने नाचताना पाहून संवेदनशील मन हेलावले.
जिल्ह्यात एका ठिकाणी काही दिवसांपूर्वी दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण झाली होती; पण त्या कटू आठवणी मागे टाकत दोन्ही समाजातील व्यक्तींनी परस्परांना रंग लावून जाती धर्मा पलीकडेही सहिष्णूतेची जपणूक करणारे सातारकर असल्याचा असा संदेश दिला. (प्रतिनिधी)
चिमुकल्यांची धूम...
तरुण आणि मोठ्यांच्या धबडग्यात चिमुकल्यांनीही रंगपंचमी खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. फुगे आणि पिचकारी याबरोबरच परस्परांच्या अंगांवर पाणी ओतून त्यांनी आनंद साजरा केला. घराच्या परिसरात खेळणाऱ्या या मुलांवर लक्ष ठेवता-ठेवता कुटुंबीयांची मात्र त्रेधा उडाली.