साताऱ्याचा आदर्श जगाने घ्यावा! : योगगुरू रविशंकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:14 AM2018-03-15T01:14:42+5:302018-03-15T01:14:42+5:30
सातारा : ‘देशाचे आरोग्य जपायचे असेल तर गावा-गावांत सेंद्रिय शेतीची लागवड झाली पाहिजे. यासाठी साताºयाने पुढाकार घ्यावा अन् त्याचा आदर्श जगासमोर ठेवावा,
सातारा : ‘देशाचे आरोग्य जपायचे असेल तर गावा-गावांत सेंद्रिय शेतीची लागवड झाली पाहिजे. यासाठी साताºयाने पुढाकार घ्यावा अन् त्याचा आदर्श जगासमोर ठेवावा, कारण येथे खूप तारे आहेत म्हणून या शहराचे नाव सातारा आहे,’ अशी भावनिक साद आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते योगगुरू रविशंकर यांनी दिली.
सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावरील संमेलनात बुधवारी सायंकाळी योग व उद्योग तसेच कौशल्य विकासातून राष्ट्राच्या निर्मितीबाबत युवा साधकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. त्यांनी सुरुवातीला सातारा जिल्ह्यातील जलयुक्त शिवार मोहिमेचे मनापासून कौतुक केले. अनेक सामाजिक उपक्रमांत साताºयाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. सेंद्रिय शेतीतही या जिल्ह्याने आपली खासियत दाखवावी, असेही आवाहन यावेळी केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘हुंडा देणार नाही अन् घेणारही नाही, अशी शपथ प्रत्येक युवक आणि युवतींनी घेतली पाहिजे. देशाच्या विकासासाठी शक्ती, भक्ती आणि युक्ती गरजेची आहे. राजकारण आणि जातीच्या नावाखाली गावागावांत संग्राम सुरू आहे. गाव पातळीवर निवडणुका झाल्या की राजकारणही संपले पाहिजे. सातारा शूरांचा जिल्हा आहे. इथल्या मातीत यश आहे. जलयुक्त शिवारात साताºयाने केलेले काम अवघ्या राज्यासाठी दिशादर्शक आहे. सेंद्रिय शेती आणि विषमुक्त अन्न या दोन बाबींसाठीही साताºयाने प्रयत्नशील राहावे.’
युवा योग अन् उद्योग याविषयी बोलताना ते म्हणाले, ‘तरुणांनी उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने देशाची उन्नती करावी. योग आयुष्य कुशलतेने जगण्याचं तंत्र सांगतं तर उद्योग जीवन सुखकर करतं. उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने देशाची उन्नती करण्याची संधी तरुणाईने घ्यावी. हिंसारहित समाज निर्माण करण्यासाठी या दोन्ही बाबी आवश्यक आहेत.’
या कार्यक्रमात काहीजणांनी उत्स्फूर्तपणे विचारलेल्या प्रश्नांना गुरुजींनी यथोचित उत्तरे दिली. दरम्यान, रविशंकर यांना त्यांच्या अनुयायांनी माणदेशी घोंगडे, शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट म्हणून दिली.
अनुयायांच्या अश्रूंना वाट मोकळी...
तांत्रिक अडचणींमुळे रविशंकर यांचे सकाळच्या सत्रातील काही कार्यक्रम रद्द करावे लागले. दुपारी चार वाजता त्यांचे कार्यक्रमस्थळी हेलिकॉप्टरने आगमन झाले. त्यानंतर सभामंडपात एकच उत्साह संचारला. ‘जय जय शिव शंभो’च्या जयघोषात त्यांचे मंचावर स्वागत करण्यात आले. साक्षात गुरुदेव यांना पाहण्याचा आनंद अनेकांनी अश्रूंकरवी व्यक्त केला. युवाचार्य संमेलन झाल्यानंतरही परस्परांना अलिंगन देऊन अनुयायांनी आनांदाश्रूंना वाट करून दिली. कार्यक्रमासाठी राज्यातील विविध ठिकाणांहून साधक आले होते.