साताऱ्याचा पारा @ 41
By admin | Published: April 15, 2017 06:39 PM2017-04-15T18:39:01+5:302017-04-15T18:39:01+5:30
अंगाची लाहीलाही : कडाक्याच्या उन्हामुळं जिवाचं पाणी पाणी!
आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. १५ : साताऱ्यासह जिल्ह्यात सूर्यनारायण आग ओकत असून, शनिवारी तर कहरच झाला आहे. यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४१ अंश सेल्सिअसचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत असून, वारंवार पाणी पिल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. कडक उन्हामुळे घामावाटे शरीरातील पाणी कमी होत असल्याने सतत तहान लागत आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगा, उंचच उंच रांगा अन् दाट झाडी यामुळे जिल्ह्यातील तापमान कायम थंड असायचे. यामुळे जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी येथील थंड हवेच्या ठिकाणी जगभरातून हौसी पर्यटक भेट देतात. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खाण्देश या भागातील लोकांसाठी महाबळेश्वर म्हणजे जणूकाही सिमला आहे.
अलीकडच्या काही दिवसांपासून कूल सिटी हॉट सिटी बनायला लागला आहे. जिल्ह्यातील तामपानही ३८ अंश सेल्सिअच्या दरम्यान स्थिरावत असल्याने इतर जिल्हे अन सातारा यांच्यामध्ये फारसा फरक राहिलेला नाही.
जिल्ह्यात मार्च महिन्यापासूनच तापमानात वाढ होत आहे. सर्वसाधारणपणे होळीपर्यंत हिवाळा कायम असतो. होळीत थंडी जळाली की उन्हाळा सुरू असतो, असा आजवरचा समज असायचा; पण यंदा त्यापूवीर्पासूनच कडक उन्हामुळे यंदाचा उन्हाळा कडक असेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. तो आत्तापासून खरा होऊ लागला आहे. (प्रतिनिधी)
पाऱ्याचा विक्रम
यंदाच्या हंगामात सरासरी ३९ ते ४० अंश सेल्सिअच्या घरात तापमान असायचे; मात्र शनिवारी पाऱ्याने विक्रमच केला. ४१ अंश सेल्सिअसचा पल्ला ओलांडला आहे. यातून महाबळेश्वरही सुटलेले नाही. महाबळेश्वरमधील तापमान सरासरी ३९ अंश सेल्सिअस असल्याचे सांगितले जात होते.
सतत पाणी पिण्याचा सल्ला
कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे शरीरातील पाणी घामावाटे बाहेर पडत असल्याने आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत पाणी पिण्याचा सल्ला दिला वैद्यकीय अधिकारी देत आहेत.