साताऱ्याचा पारा चाळीशीकडे सरकला, उकाड्यामुळे नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 02:19 PM2019-03-28T14:19:40+5:302019-03-28T14:25:55+5:30
साताऱ्याच्या पाऱ्याने चाळीशीकडे वाटचाल सुरू केली असून, बुधवारी शहराचे कमाल तापमान ३९.२ तर किमान २०.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान आहे.
सातारा : साताऱ्याच्या पाऱ्याने चाळीशीकडे वाटचाल सुरू केली असून, बुधवारी शहराचे कमाल तापमान ३९.२ तर किमान २०.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान आहे.
गेल्या पाच दिवसांपासून उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत उन्हाच्या झळा अधिक जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी शहरातील प्रमुख मार्ग व बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. नागरिक सूर्यास्तानंतरच खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत.
ढगाळ वातावरण व जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळतो न मिळतो तोच बुधवारी पारा पुन्हा चाळीशीच्या उंबरठ्यावर येऊन स्थिरावला. बुधवारी हवामान विभागाच्या वतीने कमाल तापमान ३९.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले असून, यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान आहे. यापूर्वी सोमवार, दि. २५ मार्च रोजी पारा ३९.१ अंशांवर स्थिरावला होता. उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी विविध प्रकारचे गॉगल्स, टोप्या, सनकोटसह शीतपेयांना मागणी वाढली आहे.
उष्माघात ठरू शकतो घातक
उष्णतेमुळे जाणवणारा दाहक परिणाम म्हणजे उष्माघात होय. यामध्ये शरीराचे तापमान अकस्मात उच्च पातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्तीच्या मेंदूच्या उतींना नुकसान पोहोचून व्यक्ती कोमात जाण्याची व दगावण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी उन्हात फिरताना अथवा काम करताना योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
गेल्या पाच दिवसांतील तापमान
दिनांक तापमान
कमाल किमान
२३ मार्च ३७.८ १६.६
२४ मार्च ३८.६ १९.४
२५ मार्च ३९.१ २३.१
२६ मार्च ३८.७ २२.३
२७ मार्च ३९.२ २०.१
अशी घ्याल स्वत:ची काळजी
- दररोज आठ ते सहा ग्लासपेक्षा जास्त पाणी प्यावे.
- नारळपाणी, ताज्या फळांचा रस, ताक, लिंबूपाणी घ्यावे.
- शक्यतो उन्हात बाहेर फिरणे टाळावे.
- फिरताना सोबत शक्यतो छत्री बाळगावी.
- ताजी फळे व फळभाज्यांचे अधिक सेवन करावे.
- मसालेदार, तेलकट व तिखट पदार्थ खाऊ नये.
- आहारात टरबूज, अननस, गाजर, काकडी यांचा समावेश असावा.