सातारच्या जुळ्या बहिणींच्या यशाची ‘नौका’ पार!

By admin | Published: October 18, 2015 10:53 PM2015-10-18T22:53:47+5:302015-10-18T23:33:34+5:30

हजारो स्पर्धकांशी झुंज : शेळकेवाडी येथील स्नेहल-सायली यांनी राष्ट्रीय रोर्इंग स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

Saturn's twin sisters 'boat' crosses success! | सातारच्या जुळ्या बहिणींच्या यशाची ‘नौका’ पार!

सातारच्या जुळ्या बहिणींच्या यशाची ‘नौका’ पार!

Next

सातारा : पुणे येथे झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय रोर्इंग चॅम्पियनशिप स्पर्धेत डबल स्कल या प्रकारात शेळकेवाडी, ता. सातारा येथील स्नेहल-सायली शेळके या जुळ्या बहिणींनींनी यशाची ‘नौका’ यशस्वीरीत्या पार केली. देशभरातून सहभागी झालेल्या हजारो स्पर्धकांशी कडवी झुंज देत शेळके भगिनींनी सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. त्याच्या मेहनतीला मिळालेल्या ‘सुवर्ण’झळाळीने केवळ गावाचंच नव्हे तर साताऱ्याचं नाव देशाच्या नकाशावर झळकविलं आहे. सातारा तालुक्यातील शेळकेवाडी हे एक छोटसं गाव आहे. या गावच्या मातीत वाढलेले राजेंद्र प्रल्हाद शिंदे यांना लहानपणापासूनच खेळांची आवड होती. खेळाच्या जोरावरच पुढे ते आर्मीमध्ये भरती झाले. एक उत्तम खेळाडू म्हणून त्यांनी सेवेत असताना नावलौकिक मिळविला आहे. १९९५ मध्ये एशियन गेम्समध्ये त्यांनी रोर्इंगमध्ये पदकाची कमाई करून देशाचे नाव उंचावले. त्यांनी मिळविलेल्या अलौकिक यशाची दखल घेत महाराष्ट शासनाने राजेंद्र शेळके यांचा शिवछत्रपती पुरस्काराने गौरव केला आहे. आज राजेंद्र शेळके हे आर्मीमध्ये भारताचे रोर्इंग क्रीडा प्रकाराचे वरिष्ठ प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सुवर्णपदकप्राप्त स्नेहल आणि सायली या त्यांच्याच सुकन्या आहेत.
शेळके यांच्या जुळ्या असलेल्या मुली स्नेहल आणि सायली सध्या बारावीत शिकत आहेत. वडील सरावासाठी जाताना आपल्या मुलींना बरोबर घेऊन जात. ते खेळाडूंना प्रशिक्षण देत असताना स्नेहल आणि सायली लक्षपूर्वक सर्व सूचना ऐकत असत.
खेळातील बारकावे टिपत. वडिलांबरोबर जाऊनच त्यांनी स्वयंस्फूर्तीने रोर्इंग या खेळातील बारकावे शिकून घेतले. कसून सराव केला. आज स्नेहल आणि सायली या सातारच्या सुवर्णकन्यांनी आपल्या यशाचा झेंडा देशपातळीवर फडकविल्याचे कौतुक फक्त गावालाच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्याला आहे.आजवर कुस्ती, शूटिंग, अ‍ॅक्टिंग या क्षेत्रात सातारच्या खेळाडूंनी आणि कलाकारांनी आपली प्रतिभा सिद्ध करून दाखविली आहेच. खेळातील ‘रोर्इंग’ हा क्रीडा प्रकार तसा साताऱ्यासाठी नवीनच आहे. आव्हानात्मक असणाऱ्या या खेळात सातारच्या शेळकेवाडी येथील स्नेहल आणि सायली यांनी राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून या खेळातील आपले प्रावीण्य सिद्ध करून दाखविले आहे. (प्रतिनिधी)

आता लक्ष्य आॅलिम्पिकचे -एकदा ध्येय निश्चित झाले आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सातत्यपूर्ण सराव केला तर यश हमखास मिळते. या स्पर्धेतील यशाने आमचा विश्वास आणखी वाढविला आहे. वडिलांचे मार्गदर्शन लाभत आहे. आता आॅलिम्पिकमध्ये खेळण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. त्यासाठी मेहनत घेणार आहे.
- स्नेहल शेळके, सायली शेळके
रोर्इंग खेळाडू


शेळकेवाडीत होणार दिमाखदार सत्कार समारंभ
शेळकेवाडीच्या सुकन्या स्नेहल आणि सायली या भगिनींनी राष्ट्रीय रोर्इंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याबद्दल गावात त्यांच्या अभिनंदनाचे फलक झळकत आहेत. लवकरच या सुवर्णकन्यांच्या दिमाखदार सत्कार समारंभाचे आयोजन शेळकेवाडीत करणार आहोत.
- मनोज शेळके, शेळकेवाडी

Web Title: Saturn's twin sisters 'boat' crosses success!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.