Satara: रणधुमाळी पाटणची, पण धुरळा मुंबईत उडणार; देसाई, पाटणकर गटासह उद्धवसेनेचेही चाकरमानी मतदारांवर लक्ष
By दीपक देशमुख | Published: October 22, 2024 04:06 PM2024-10-22T16:06:22+5:302024-10-22T16:09:14+5:30
पाटणकर, कदम यांच्या भूमिकेकडे लक्ष
दीपक देशमुख
सातारा : पाटण विधानसभा मतदारसंघातील जवळपास ४० हजार मतदार मुंबईत कामानिमित्त वास्तव्यास असल्याने मतदारसंघांची रणधुमाळी पाटणपुरती मर्यादित न राहता मुंबईपर्यंत प्रचाराचा धुरळा उडणार आहे. पाटणकर आणि देसाई गटांचे मुंबईतील कार्यकर्ते कामाला लागले असताना उद्धवसेनाही यात उतरली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून पक्षाने मुंबईतील निर्णायक मतदानावर लक्ष केंद्रित केले आहे.
पाटण मतदारसंघातील रणसंग्राम आतापर्यंत पाटणकर आणि देसाई या दोन गटांत होत आला आहे. या मतदारसंघात आतापर्यंत पक्ष कोणताही असो, देसाई आणि पाटणकर या दोन गटांतच पारंपरिक लढत होत आली आहे. दोन्ही गटांनी चुरशीने झुंज दिली आहे. याठिकाणी प्रत्येक गावातील एकेक मतदानासाठी दोन्ही गट प्रयत्नशील असतात. पाटणचा मतदार माथाडी कामगार तसेच इतर अनेक नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक असून, सुमारे ४० हजारांहून अधिक मतदार येथे आहेत. मतदारांना आपल्याकडे वळवून घेण्यासाठी दोन्ही गटांनी कसोसीने प्रयत्न सुरू केले आहेत.
त्याचप्रमाणे मुंबईतील उद्धवसेनेनेही पाटणवर लक्ष केंद्रित केले आहे. देसाई आणि पाटणकर यांचे गट मुंबईतल्या या मतदारांशी संवाद साधत असताना पाटणमधील उद्धवसेनेनेही अडीच वर्षांपासून मुंबईत राबता ठेवला आहे. यामुळे पाटणच्या लढ्यात ट्विस्ट आला आहे. रणधुमाळी पाटणची असली तरी धुरळा मुंबईतदेखील उडणार हे मात्र नक्की.
पाटणकर, कदम यांच्या भूमिकेकडे लक्ष
मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मोठी भूमिका बजावली. मात्र, हा निर्णय न पटलेले पाटणमधील अनेक शिवसैनिक उद्धवसेनेतच राहिले. त्यांचे नेतृत्व हर्षद कदम करत आहेत. पाटणचा विद्यमान आमदार पक्ष सोडून गेला तरी कदम यांनी उद्धवसेनेतून उमेदवारी मागितली आहे. त्यांनीही गेल्या अडीच वर्षांपासून पनवेल, ऐरोलीपासून ते मुलुंड, कुर्ला, दादरपर्यंत मुंबईल्या भागवाल्यांशी संपर्क ठेवला आहे. सत्यजीत पाटणकर आणि हर्षद कदम एकत्रित येऊन पाटणमध्ये महायुतीला आव्हान देणार की, त्यांच्यातच रस्सीखेच होणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.