राजेंच्या मनोमिलनाच्या दुसऱ्या अध्यायाची सत्त्वपरीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:25 PM2019-03-31T23:25:39+5:302019-03-31T23:25:44+5:30
सागर गुजर । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : तालुक्यातील बहुसंख्य राजकीय संस्थांवर उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वर्चस्व ...
सागर गुजर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : तालुक्यातील बहुसंख्य राजकीय संस्थांवर उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वर्चस्व आहे. या दोघांतील संघर्ष साहजिकच दोन्ही गटांच्या कार्यकत्यांमध्येही भिनलेला आहे. लोकसभा निवडणुकीत या दोन्ही राजांच्या पुन्हा झालेल्या मनोमिलनाची खरी सत्त्वपरीक्षा लागणार आहे.
सातारा शहरात खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील सातारा विकास आघाडी सत्तेत आहे. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील नगर विकास आघाडी प्रमुख विरोधक आहे. सातारा विकास आघाडीचे २२, नगर विकास आघाडीचे १२ व भाजपचे ६ नगरसेवक निवडून आले आहेत. मनोमिलनापूर्वी शिवेंद्र्रसिंहराजे यांच्या गटाच्या भूमिकेविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र, आता त्यांनी आपली भूमिका राष्ट्रवादीचे उमेदवार व त्यांचे बंधू उदयनराजे यांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपचेही सातारा पालिकेत ६ नगरसेवक आहेत. ते साहजिकच शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासाठी काम करतील.
संपूर्ण सातारा तालुक्याच्या ग्रामीण भागाचा विचार केला तर परळी, लिंब, पाटखळ, शेंद्र्रे, गोडोली या पाच जिल्हा परिषद गटांत शिवेंद्र्रसिंहराजे गटाची सत्ता आहे. शाहूपुरी, कोडोली, नागठाणे या तीन गटांत उदयनराजे यांचे वर्चस्व आहे. तर वर्णे या गटात भाजपचे मनोज घोरपडे यांचे प्राबल्य आहे. या गटात मनोज घोरपडे यांच्यासह पंचायत समितीला संजय घोरपडे हे भाजपच्या चिन्हावर निवडून आले. वनवासवाडी गटामधून भाजपचा सदस्य निवडून आला आहे.
लिंब गटातून प्रतीक कदम, जितेंद्र सावंत, सरिता इंदलकर, पाटखळमधून वनिता गोरे, राहुल शिंदे, दयानंद उघडे शाहूपुरीतून अनिता चोरगे, संजय पाटील, वसुंधरा ढाणे, कोडोलीतून अर्चना देशमुख, रामदास साळुंखे, रेखा शिंदे, परळीतून कमल जाधव, विद्या देवरे, अरविंद जाधव, शेंद्रेतून शिवाजीराव चव्हाण, छाया कुंभार, हणमंत गुरव, नागठाणेतून भाग्यश्री मोहिते, विजया गुरव, बेबीताई जाधव, गोडोलीतून मधू कांबळे, मिलिंद कांबळे, आशुतोष चव्हाण अलका बोभाटे या जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सदस्य यांना कामाला लागण्याच्या सूचना दोन्ही राजेंनी नुकत्याच झालेल्या मेळाव्यात दिल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या एका गटात सर्वसासाधारण ४० हजार मतदान असते. त्यामुळे हे मतदान निर्णायक ठरणार आहे. तालुक्यातून जादाचे मताधिक्य मिळवण्यावर उदयनराजे भोसले यांचा प्रयत्न राहणार आहे.
वर्णे गटातील भाजपचे सदस्य मनोज घोरपडे हे कºहाड उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा तयारी करत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत युतीच्या नरेंद्र पाटील यांना आपल्या भागातून किती आघाडी मिळवून देणार? यावर त्यांच्या विधानसभा निवडणुकीचे भविष्य अवलंबून असल्याने तेही ताकदीने कामाला लागले आहेत.
तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती दोन्ही राजेंचे नेतृत्व मानणाऱ्या आहेत. मात्र दोन राजेंतील टोकाचा संघर्ष त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनुभवला असल्याने त्यांची अजूनही दोलायमान स्थिती आहे.
वनवासवाडीत पक्षकार्य की राजेनिष्ठा ?
खासदार उदयनराजे भोसले यांचे नेतृत्व मानणारे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य संदीप शिंदे यांनी मागील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा झेंडा हाती घेतला होता. त्यांच्या पत्नी रेश्मा शिंदे वनवासवाडी गटातून भाजपच्या चिन्हावर जिल्हा परिषदेत निवडून गेल्या आहेत. संदीप शिंदे हे उदयनराजे भोसले यांच्या प्रचारात उतरले आहेत. त्यांच्या पत्नी पक्ष आदेश पाळणार का ? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.