दिवाळीच्या सुटीसाठी सातारकर सुटीवर..पोलिस गस्तीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 04:12 PM2017-10-26T16:12:53+5:302017-10-26T16:21:49+5:30
दिवाळीच्या सुटीसाठी अनेकजण आपल्या गावी आणि पर्यटनासाठी गेले आहेत. घराला कुलूप असल्याने चोरटे अशाच संधीचा फायदा उठवत असतात. सातारकरांना सुटीचा आनंद घेता यावा म्हणून पोलिसांनी नेहमीपेक्षा जादा कुमक रात्रगस्तीवर वाढविली आहे.
सातारा , दि. २६ : दिवाळीच्या सुटीसाठी अनेकजण आपल्या गावी आणि पर्यटनासाठी गेले आहेत. घराला कुलूप असल्याने चोरटे अशाच संधीचा फायदा उठवत असतात. सातारकरांना सुटीचा आनंद घेता यावा म्हणून पोलिसांनी नेहमीपेक्षा जादा कुमक रात्रगस्तीवर वाढविली आहे.
दिवाळी आणि मे महिन्याच्या सुटीमध्ये विशेषत: चोरीचे प्रकार वाढत असतात. या कालावधीत मोठी सुटी असल्यामुळे अनेकजण आपल्या गावी किंवा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अनेक ठिकाणी भेटी देतात.
घराला कुलूप दिसल्यानंतर चोरटे पाळत ठेवून आपला डाव साधत असतात. यापूर्वी अनेकदा पोलिसांना या दोन सुट्यांमध्ये चोरीचे प्रकार वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून पोलिसांनी शहरातून रात्रगस्त वाढविली आहे.
इतरवेळी शहरातून पेट्रोलिंगची एक गाडी फिरत होती. मात्र, दिवाळीच्या या सुटीमध्ये तीन गाड्या पेट्रोलिंगसाठी वाढविण्यात आल्या आहेत. अद्यापही शाळा सुरू झाल्या नसल्यामुळे अनेकजण साताऱ्यातून बाहेरच आहेत. अशा लोकांच्या घरामध्ये चोरीचे प्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे.
एवढेच नव्हे तर दोन पथकांना निर्जन आणि शहराच्या उपगनरामध्ये सुरक्षेसाठी नेमण्यात आले आहे. हे पथक परिस्थितीनुसार चालतही पेट्रोलिंग करत आहे. रात्री-अपरात्री शहरात येणाऱ्या आणि शहरातून बाहेर जाणारे प्रत्येक वाहन पोलिस तपासून सोडत आहेत.
अपार्टमेंटमध्ये असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनाही सतर्क करण्यात आले आहे. त्यामुळे अपार्टमेंटमध्ये बंद असलेला फ्लॅट चोरट्यांना लक्ष्य करता येणार नाही, याची पुरेपूर काळजी पोलिसांनी घेतली आहे.