सौमित शहाच्या मृत्यूचे गूढ वाढलं, मैत्रिणीची कसून चौकशी; तपासासाठी पथके रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 05:45 PM2022-11-09T17:45:38+5:302022-11-09T17:46:02+5:30
सौमितच्या मित्र-मैत्रिणींकडून मिळालेली माहितीच सौमितच्या मृत्यूचे गूढ उलगडणार आहे
शिरवळ : सांगली येथील प्रसिद्ध उद्योजक सुमेध शहा यांचा मुलगा सौमित शहा (वय २३) याच्या मृत्यूचे गूढ आणखीनच वाढत आहे. सौमितच्या मैत्रिणीची आणि मित्रांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. यावरही विसंबून न राहता पोलिसांनी विविध ठिकाणी तपासासाठी दोन पथके रवाना केली आहेत. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनीही या प्रकरणामध्ये स्वत: लक्ष घातले असून, त्यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या.
याबाबत माहिती अशी की, सांगली येथील प्रसिद्ध उद्योजक सुमेध शहा यांचा एकुलता एक मुलगा सौमित शहा हा शनिवार, दि. ५ रोजी कारने (क्रमांक एमएच १०-डिजी ६७७७) पाच मित्रांसमवेत पुण्याला गेला होता. यावेळी संबंधितांनी वाकड, पिंपरी चिंचवड परिसरातील एका हॉटेलमध्ये रूम घेतली होती. सायंकाळी जेवण करण्यासाठी सर्व मित्र थांबले होते. त्यावेळी अचानक सौमितने ‘मी मैत्रिणीला भेटून येतो,’ असे सांगून कार घेऊन निघून गेला. मात्र, उशिरापर्यंत तो आला नाही.
दरम्यान, रविवारी सकाळी त्याचा मृतदेह निरा नदीत सापडला. सौमितच्या गळ्यात सोन्याची चेन, अंगठी, हातामध्ये सोन्याचे कडे, डिजिटल घड्याळ व महागडा मोबाइल होता. या वस्तूही गायब आहेत. त्यामुळे त्याचा घातपात झाला आहे की काय, या अनुषंगानेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ज्या मैत्रिणीला तो भेटायला गेला होता, त्या पुण्यातील मैत्रिणीकडे आणि त्याच्या मित्रांकडे पोलिसांनी तपास केंद्रित केला आहे. त्यांच्या जबाबातून साैमितच्या मृत्यूबाबत वेगळी काही माहिती मिळतेय का, याचीही चाचपणी पोलिसांकडून सुरू आहे.
तपास पथकावरच आता भर
सौमितच्या मृत्यूचा उलगडा होण्यासाठी शिरवळ पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. दोन पथके पुणे आणि इतर ठिकाणी पाठविण्यात आली आहेत. आता या पथकावरच काय तो तपासाचा भर आहे. या पथकाला मिळालेली माहिती आणि सौमितच्या मित्र-मैत्रिणींकडून मिळालेली माहितीच सौमितच्या मृत्यूचे गूढ उलगडणार आहे