पहिल्याच दिवशी १५ लाख लिटर पाण्याची बचत-: मल्हारपेठ परिसरात आज पाणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 09:26 PM2019-05-10T21:26:55+5:302019-05-10T21:28:37+5:30
कास तलावाची पाणी पातळी खालावल्यामुळे साताºयात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारपासून याची अंमलबजावणी सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी
सातारा : कास तलावाची पाणी पातळी खालावल्यामुळे साताºयात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारपासून याची अंमलबजावणी सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी १५ लाख लिटर पाण्याची बचत झाली आहे. पाणी न सोडल्यामुळे शहरात कुठेही समस्या उद्भवली नसून, सातारकरांमधून पाणी बचतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कास धरणामध्ये ३ फुटांचा उपयुक्त तर ५ फुटांचा मृत पाणीसाठा आहे. यातून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा पाणीपुरवठा विभागाचा प्रयत्न आहे. कास योजनेवरील भागास दररोज १ इंच पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी पावसाळा उशिरा सुरू होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणीकपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
राजवाडा, बुधवार नाका आणि व्यंकटपुरा पेठेत असणाºया या तीन टाक्यांमधून शुक्रवारी पाणीपुरवठा सोडण्यात आला नाही.
या तिन्ही टाकीमध्ये १५ लाख लिटर पाणीसाठा असतो. हा पाणीसाठा न सोडल्यामुळे पहिल्याच दिवशी १५ लाख लीटर पाण्याची बचत झाली. संत कंबीर सोसायटी, पोळवस्ती, पापाभाई पत्रेवाला चाळ, चिमणपुरा पेठ, गारेचा गणपती, मनामती चौक, नागाचा पार, पद्ममावती मंदिर परिसर, होलार समाज मंदिर परिसर, मंगळवार पेठ, ठक्कर कॉलनी, बोगदा ते समर्थ मंदिर परिसर, मंगळवार पेठ, धस कॉलनी, दस्तगीर कॉलनी या परिसरामध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा झाला नाही.
या परिसरात राहणाºया नागरिकांना पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पूर्वकल्पना दिल्यामुळे नागरिकांनी घरात एक दिवसाचा पाणीसाठा करून ठेवला होता. त्यामुळे पाण्याची काटकसर करून नागरिकांनी पाणी वापरले. परिणामी या परिसरातून एकही तक्रार नागरिकांकडूनच नव्हे तर एकाही नगरसेवकाने केली नसल्याचे समोर आले. पहिल्या दिवशी पाणी बचतीला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी सांगितले.
पाणी बचतीची आज यांची बारी...
मल्हार पेठ, बडेकर वस्ती, नकाशपुरा, सावकार गॅरेज परिसर, शनिवार पेठ या परिसरामधील लोकांची पाणी बचतीची शनिवार दि. ११ रोजी बारी आहे. या भागामध्ये पाणी सोडण्यात येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.