नायगाव येथे उभारणार सावित्रीसृष्टी : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 11:52 PM2019-01-03T23:52:39+5:302019-01-03T23:55:52+5:30

खंडाळा : ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी तत्कालीन समाजाला सामाजिक क्रांतीची नवी दृष्टी दिली. पुरोगामी महाराष्ट्राची ...

 SavitriSavitrishti to be built in Naigaon: Devendra Fadnavis | नायगाव येथे उभारणार सावित्रीसृष्टी : देवेंद्र फडणवीस

नायगाव, ता. खंडाळा येथे ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फुले दाम्पत्याची प्रतिमा भेट देण्यात आली. याप्रसंगी संजीवराजे नाईक-निंबाळकर, निखील झगडे, पालकमंत्री विजय शिवतारे, मंत्री राम श्ािंदे, रामराजे नाईक-निंबाळकर, सदाभाऊ खोत उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देविविध कामांचे प्रस्ताव तयार करण्याचे जिल्हा प्रशासनाला आदेश

खंडाळा : ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी तत्कालीन समाजाला सामाजिक क्रांतीची नवी दृष्टी दिली. पुरोगामी महाराष्ट्राची मुहूर्तमेढ त्यांनीच रोवली. महाराष्ट्राचे हे पुरोगामित्व मागे जाऊ देणार नाही. फुले दाम्पत्याचा समतेचा संदेश जगभर पोहोचविण्यासाठी नायगाव येथे ‘सावित्रीसृष्टी’ निर्माण करणार आहे,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नायगाव, ता. खंडाळा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८८ व्या जयंती सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, जलसंपदा मंत्री प्रा. राम शिंदे, पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, आ. जयकुमार गोरे, आ. शंभूराज देसाई, आ. मनीषा चौधरी, कमलताई ढोले-पाटील, महापौर राहुल जाधव, बापूसाहेब भुजबळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, नायगावचे सरपंच निखील झगडे तसेच जिल्हा परिषद व खंडाळा पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘तत्कालीन काळात महिलांना अधिकार नाकारले गेले, तेव्हा फुले दाम्पत्याने लढा उभारला. सनातनी, रुढीवादी यांचा विरोध झुगारून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ उभारली. समाजात मुली, महिला पुढे जाताना दिसतात, यामागे सावित्रीबार्इंच्या कार्याची प्रेरणा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानातून समतेचा पुरस्कार करण्याची प्रेरणा महात्मा फुले यांच्याकडून मिळाली. हाच समतेचा विचार महाराष्ट्रात यापुढेही जोपासला जाईल. देशातील महिला व वंचितांसाठी फुले दाम्पत्याने भरीव काम केले आहे. संत सावता माळी यांचे जन्मगाव असणाऱ्या अरणचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला असून, तेही काम वेगाने मार्गी लावणार आहे.’

नायगाव ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘बेटी बचाव-बेटी पढाओ’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाºया आर्या देशपांडे, जनाबाई हिरवे, यशस्वी साळुंखे आणि प्रांजल साळुंखे या मुलींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सावित्रीबार्इंचा विचार घराघरात पोहोचण्यासाठी ‘सावित्रीसृष्टी’ उभारण्याबरोबरच नायगावला ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा, महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र यासह कटगुण येथील महात्मा फुले स्मारकाचा विकास, पुणे येथील भिडे वाड्यात स्मारक, नायगाव ते मांढरदेव नवीन रस्ता, मुलींसाठी आयटीआयमध्ये वाढीव जागा, अरण येथील संत सावता महाराज मंदिराचा विकास, नीरा देवघर उपसा सिंचन योजना पूर्ण करणे अशा विविध मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांनी स्वागत केले. सरपंच निखील झगडे यांनी प्रास्ताविक केले तर उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी आभार मानले.


सावित्रीच्या पोवाड्याने उपस्थित मंत्रमुग्ध
नायगाव येथील स्मारकापासून सभास्थळापर्यंत सावित्रीमाईच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. येथील महिलांच्या ढोल पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तर कार्यक्रमस्थळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या गीतमंच पथकाने सादर केलेल्या सावित्रीच्या पोवाड्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले.

 

Web Title:  SavitriSavitrishti to be built in Naigaon: Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.