म्हणे 'पैशांचा पाऊस पडतो' थापाड्या काका महाराजाला बेड्या!
By दत्ता यादव | Published: June 26, 2024 08:11 PM2024-06-26T20:11:41+5:302024-06-26T20:12:00+5:30
36 लाखांचा घातला गंडा: फसवणारे टोळी कार्यरत
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पैशांचा पाऊस पाडून देतो, असे सांगून एकाला ३६ लाखांना गंडा घालणाऱ्या पंढरीनाथ गणपती पवार ऊर्फ काका महाराज (वय ५४, रा. कापडे भवाणवाडी, ता. पोलादपूर, जि. रायगड) याला सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने बुधवारी अटक केली.
अमित श्रीरंग शिंदे (वय ४२, रा. नाडे, ता. पाटण, सध्या रा. रविवार पेठ, सातारा) यांची तीन वर्षांपूर्वी काका महाराज याच्याशी ओळख झाली. त्यावेळी काका महाराज याने शिंदे यांना पैशांचा पाऊस पाडून हवेतून गुप्तधन काढून देतो. तसेच वीज पडलेल्या भांड्यावर अघोरी पूजा जादूटोणा चमत्कार करून त्याच्या विक्रीतूनही तुम्हाला पैसे मिळतील, असे सांगितले. यानंतर शिंदे यांनी स्वत:कडचे काही पैसे तसेच इतर ओळखीच्या पाचजणांचे पैसे, असे मिळून तब्बल ३६ लाख रुपये काका महाराजला कधी रोख तर कधी ऑनलाइन पाठवले. हे पैसे दिल्यानंतर करोडे रुपये मिळतील, अशी आशा शिंदे यांच्यासह इतरांना होती. काका महाराज याने त्यांचा विश्वास बसवा म्हणून हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे टोळक्यांकडे नेले. त्या ठिकाणी त्या टोळक्याने प्रात्यक्षिक करून दाखविले. मात्र, पैशाचा पाऊस काही पडला नाही. हा प्रकार सप्टेंबर २०२१ला घडला. या प्रकारानंतर शिंदे यांच्या ओळखीने ज्यांनी पैसे यात गुंतवले होते. ते लोक शिंदे यांना पैसे मागू लागले. या प्रकारानंतर शिंदे यांनी २५ जून २०२४ रोजी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. हे प्रकरण गंभीर असल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरणचे पोलिस उपनिरीक्षक सुधीर माेरे, हवालदार नीलेश यादव, सुजित भोसले, नीलेश जाधव, पंकज मोहिते, विक्रम माने, सचिन रिटे, इरफान मुलाणी यांचे पथक रायगड जिल्ह्यामध्ये गेले. तेथे पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेऊन चाैकशी केली असता पोलादपूर येथे काका महाराज असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन काका महाराज याला अटक केली.
चाैकट : व्यावसायिक, कर्जबाजारी गळाला
पैशाचा पाऊस पाडून आमिष दाखविणाऱ्या या टोळीमध्ये दहा ते बाराजणांचा समावेश असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. ही टोळी व्यावसायिक, कर्जबाजारी झालेल्या व्यक्तींना शोधून गंडा घालत होती. काका महाराज याच्याकडे कसून तपास केल्यानंतर त्याच्या साथीदारांपर्यंत पोहोचता येणार आहे. त्यानंतरच यामध्ये कोणा-कोणाचा सहभाग आहे, हे निष्पन्न होणार आहे, असे पोलिसांनी सांगितले