टंचाई बैठक, प्रस्ताव नावाला पाणी मिळेना गावाला !
By admin | Published: April 6, 2017 05:57 PM2017-04-06T17:57:32+5:302017-04-06T17:57:32+5:30
कऱ्हाड तालुका : ६७ गावांचे पाणीटंचाईचे प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे धूळखात : लोकप्रतिनिधींच्या सूचनांना अधिकाऱ्यांकडून कोलदांडा
आॅनलाईन लोकमत
कऱ्हाड (जि. सातारा), दि. ६ : तालुक्यात सध्या सुमारे पन्नासहून अधिक गावांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. संभाव्य पाणीटंचाई आढावा बैठकीस महिना होत आला तरी आतापर्यंत प्रशासनाकडून याबाबत कोणतीच कार्यवाही केली जात नाही. तर दुसरीकडे येथील पंचायत समितीने ग्रामसभेच्या ठरावाच्या माध्यमातून ६७ ठराव प्रांताधिकारी यांच्याकडे पाठविलेले आहे. मात्र, त्या गावांचे प्रस्ताव ठरावाबाबत कोणताच निर्णय झालेला नसल्याने आलेले प्रस्ताव, घेतलेल्या टंचाई बैठका नुसत्या नावाला आणि पाणी मिळेना एकाही गावाला, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कऱ्हाड तालुक्यातील पन्नासहून अधिक गावांना यावर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता प्रशासनाच्या वतीने महिनाभरात झालेल्या बैठकीतून वर्तविली होती. त्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी संबंधित गावांतील अधिकाऱ्यांनी गावाचा आढावा प्रशासनास लवकरात लवकर सादर करावा, असे आदेशही दिले होते. मात्र, या गावांपैकी ६७ गावांचे पाणी मागणीचे प्रस्ताव व ठराव प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे सादर केले गेलेले आहेत. मात्र, त्या गावांबाबत महिना झाला तरी ठोस निर्णय अद्यापपर्यंत घेतला गेलेला नसल्याने तेथील गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत जलसर्वेक्षण पूर्ण करणे गरजेचे होते. त्यापैकी किती जणांनी हे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. हा संशोधनाचा विषय आहे.
कऱ्हाड तालुक्यात २२२ गावे असून, १९८ ग्रामपंचायती आहेत. तर तालुक्याची ग्रामीणची लोकसंख्या ही ५ लाख ८४ हजार ८५ इतकी आहे. तालुक्यात सरासरी पर्जन्यमान हे ६३० मिलीमीटर आहे. तालुक्यात प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना या चार तर स्वतंत्र पाणीपुरवठा योजना २७२ आहेत. लघू नळ पाणीपुरवठा योजना या १५० आहेत. हातपंपांची संख्या ही १ हजार २४६ इतकी आहे. मात्र, सध्या पाणीटंचाईच्या झळा अनेक गावांना सोसाव्या लागत आहे. काही गावांची तर ह्यपाणी उशाला अन् मिळेना प्यायला घशाला,ह्ण अशीच अवस्था झाली आहे. अशात तीन टप्प्यांत प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे पाणी मागणीचे एकूण ६७ गावांचे प्रस्ताव आलेले आहेत. मात्र, याबाबत अजूनही त्यांच्याकडून ठोस उपाययोजना आखण्यात आलेल्या नाहीत. पाणीटंचाईचे प्रस्ताव तत्काळ सादर करा, अशा सूचना प्रांताधिकारी किशोर पवार यांनी संभाव्य पाणीटंचाईच्या बैठकीत दिल्या होत्या. त्यानंतर आता प्रत्यक्षात प्रस्ताव दाखल झाल्याने याबाबत तत्काळ निर्णय का घेतले जात नाहीत, अशी विचारणा सर्वसामान्य शेतकऱ्यांतून केली जात आहे.
शासकीय काम आणि महिनाभर थांब अशी स्थिती सध्या प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडून केल्या जात असलेल्या कामकाजावरून दिसून येत आहे. तालुका टंचाईग्रस्त घोषित करण्यासारखी परिस्थिती तालुक्यात सध्या निर्माण झाली आहे. मात्र, याबाबत तत्काळ निर्णय घेऊन पाणीपुरवठा करण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देणे गरजेचे आहे. मात्र, त्याबाबतच्या आदेशाचे पालनही या जबाबदार अधिकाऱ्यांकडून केले जात नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
सतरा गावे पाणी टंचाईग्रस्त तर तीन गावांना टँकरने पाणी
कऱ्हाड तालुक्यातील सतरा गावांमध्ये पाण्याची टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामध्ये कालेटेक, जुजारवाडी, चचेगाव, नांदगाव, पवारवाडी, मनव, बामणवाडी गावठाण, बामणवाडी-पवारवाडी, शिबेवाडी, ओंड, घारेवाडी, अंतवडी, रिसवड, गोसावेवाडी, किवळ, सयापूर, करंजोशी या गावांचा समावेश आहे. तर गोसावेवाडी, घोलपवाडी व कोरीवळे या तीन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
सहा गावांतील योजनांची दुरुस्ती
तालुक्यातील भवानवाडी, भुरभुशी, गायकवाडवाडी, पाल, यादववाडी, लटकेवाडी या गावांतील पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तर अंतवडी, बामणवाडी, रिसवड या गावांतील खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे.
प्रशासनाकडे तीन टप्प्यांत प्राप्त झालेले ६७ गावांचे प्रस्ताव
कऱ्हाड पंचायत समितीतील पाणीपुरवठा विभागास ६७ ग्रामपंचायतींकडून पाणीटंचाई घोषित होण्याचे आलेले प्रस्ताव संबंधित विभागाकडून तहसीलदार व प्रांताधिकारी किशोर पवार यांना तीन टप्प्यांत पाठविण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पहिला प्रस्ताव २० फेब्रुवारी रोजी, दुसरा प्रस्ताव १७ मार्च रोजी तर तिसरा प्रस्ताव ३१ मार्च रोजी पाठविण्यात आलेले आहेत.
टंचाई घोषित प्रस्ताव पाठविण्यात आलेली ६७ गावे
पेरले, महारूगडेवाडी, टाळगाव, अंतवडी, कु सूर, खोडशी, शिंदेवाडी-विंग, घारेवाडी, कोरेगाव, धावरवाडी, खालकरवाडी, कोळे, रिसवड, नांदगाव, पोतले, काले, उत्तर कोपर्डे, शिंगणवाडी, शेरे, पवारवाडी-नांदगाव, नांदलापूर, कवठे, आरेवाडी, बेलदरे, दुशेरे, अंधारवाडी, खुबी, म्हासोली, जुळेवाडी, कालेटेक, ओंडोशी, गोंदी, सयापूर, चचेगाव, भवानवाडी, ओंड, वानरवाडी, बामणवाडी, हरपळवाडी, करंजोशी, वराडे, गायकवाडवाडी, पाडळी-हेळगाव, बानुगडेवाडी, मनू, गोसावेवाडी, येळगाव, पाल, कालगाव, कोळेवाडी, गमेवाडी, सावरघर, येवती, भोळेवाडी, भुरभुशी, तुळसण, उंडाळे, मांगवाडी, गोडवाडी, निगडी, मरळी, किवळ, वनवासमाची-खोडशी, जुने कवठे, नवीन कवठे, किरपे, शेळकेवाडी- म्हासोली, अशा ६७ गावांचे प्रस्ताव प्रशासनास पाठविण्यात आलेले आहेत.