पसरणी घाटाला दरडींचे दुखणे!
By admin | Published: September 9, 2014 10:41 PM2014-09-09T22:41:03+5:302014-09-09T23:44:12+5:30
सत्र सुरूच : चालू वर्षातील चौथी घटना
वाई : सतत पडणाऱ्या पावसामुळे वाई-पसरणी घाटात सोळा नंबर ते हॅरीसन फॉल्डी (थापा) या भागात मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता पुन्हा एकदा दरड कोसळल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला असून सुदैवाने कोणतीही जीवित हानीचा प्रकार घडला नाही. मात्र प्रवाशी व शाळेत येणाऱ्या-जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. घटनास्थळी वाईचे तहसीलदार एस. एम. पडदुणे यांनी पाहणी केली. बांधकाम विभाग आणि पोलीस विभाग हजर राहून दरड हटविण्याचे काम करण्यात आले.देशभरातील हजारो पर्यटक व वाईहून पसरणी-महाबळेश्वरला कामानिमित्त जाणारे नागरिक, शाळांमध्ये जाणारे विद्यार्थी वाई-पाचगणी घाटातून प्रवास करत असतात. अत्यंत नागमोडी वळणाचा व पावसाळ्यात विलोभनीय निसर्ग सौंदर्य असलेल्या या परिसरात अनेक उंच कडे दरडी आहेत.या वर्षी सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी जमीन खचणे, दरडी कोसळणे असे प्रकार घडले आहेत. वाई-पसरणी घाटात ही चौथी घटना असून यावर्षी अशा घटनेमुळे पर्यटक, स्थानिक प्रवाशी व विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली असून त्यामुळे घाटात प्रवाशांच्या गाड्यांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी बांधकाम विभागाच्या दोन जेसीबी, दगड फोडण्याचे ब्रेकर यांनी दरड हटविण्याचे काम केले. (प्रतिनिधी)
अलिकडच्या काळात डोंगर दऱ्यावरील मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड व दरवर्षी लावले जाणारे वणवे यामुळे डोंगरमाथे बोडके झाले आहेत. त्यामुळे सतत पडणाऱ्या पावसामुळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होऊन दरडी कोसळण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच रस्ता रुंदीकरणाच्या वेळी करत असलेले मोठे ब्लास्ट यांनाही कडे-दरडी यांना मोठे हादरे बसून मोठ्या भेगा पडतात. पावसाळ्यात यात पाणी जाऊनही दरडी कोसल्याने वाई-पसरणी घाटात अलिकडच्या काळात वाढले आहेत.
मी विद्युत कंपनीच्या पाचगणी येथील कार्यालयात काम करते. वाईहून कामाला जात असून वारंवार घडणाऱ्या दरड कोसळणाऱ्या घटनांमुळे कामावर वेळेवर पोहोचता येत नाही.
संगीता निकम
विद्युत कंपनी, कर्मचारी
घटना घडल्यानंतर ताबडतोब बांधकाम विभागाच्या दोन जेसीबी, एक ब्रोकर व ट्रॅक्टर ट्रॉली लावून दरड हटविण्याचे काम हाती घेतले व प्रवाशांसाठी लवकरच रस्ता मोकळा करण्यात आला.
एस. एम. पडदुणे, तहसीलदार, वाई