भोंदूबाबाचा शिरवळला पर्दाफाश
By admin | Published: July 24, 2015 10:12 PM2015-07-24T22:12:22+5:302015-07-25T01:13:30+5:30
तिघांना अटक : मूल होण्यासाठी नारायण नागबळी पूजेचा उपाय सांगून ११ हजारांची मागणी
शिरवळ : जादूटोण्याच्या माध्यमातून हमखास मूल देण्याचा दावा करणाऱ्या भोंदूबाबाचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी शिरवळ पोलिसांच्या मदतीने भांडाफोड केला. येथील एका लॉजवर तो मुक्काम ठोकून होता आणि आपल्या कथित दैवी शक्तीची जाहिरात करीत होता. तुकाराम किसन जोशी-मुके (वय ४८, रा़ वाकोद, ता. जामनेर, जि. जळगाव) असे या भोंदूबाबाचे नाव असून, त्याच्या दोन शिष्यांनाही शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, येथील एका लॉजवर हा कथित तुकाराममहाराज गोंविदा गंगाराम जोशी (२४) व ज्ञानेश्वर शांताराम जोशी (२५) या दोन शिष्यांसमवेत खोली भाड्याने घेऊन गुरुवारी राहण्यास आला होता. आपल्या साथीदाराच्या मदतीने पत्रके छापून ती त्याने वितरित केली होती.
या प्रकाराची माहिती ‘अंनिस’चे राज्य सरचिटणीस प्रशांत पोतदार यांना मिळाली. त्यानुसार ‘अंनिस’चे कार्यकर्ते भास्कर सदाकळे यांनी एका पत्रकार महिलेसमवेत पती-पत्नी असल्याचे दाखवून बाबाच्या ‘दरबारा’त हजेरी लावली. ‘आम्ही प्रेमविवाह केला असून, आम्हाला मूलबाळ होत नाही,’ असे त्यांनी तुकाराम मुके याला सांगितले. भोंदूबाबा तुकाराम महाराज याने मूल न होण्याचे अतिशय विचित्र कारण सांगितले. नंतर ‘मूल होण्यासाठी नाशिक या ठिकाणी नारायण नागबळीची पूजा करावी लागेल. त्यासाठी आत्ता ११०० रुपये द्या. पूजेकरीता तुमच्या पत्नीला नाशिक येथे एकटीला पाठवावे लागेल. त्या पूजेसाठी ११ हजार रुपये खर्च येईल,’ असे त्याने सांगितले.
दरम्यान, याबाबत ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे यांच्याशी संपर्क साधून कारवाई करण्याची विनंती केली़. त्यानुसार शिरवळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार एस. एस. मोरे, हवालदार रवींद्र कदम, आर. व्ही. सूर्यवंशी, एस. बी. पवार, चंद्रकांत निकम, महिला पोलीस फडतरे, विकास देवकर यांच्या पथकाने संबंधित लॉजवर छापा टाकला. ‘अंनिस’चे कार्यकर्ते प्रशांत पोतदार, भास्कर सदाकळे, संदीप कांबळे, गणेश वायदंडे, सागर कासेगावकर यांच्या मदतीने पोलिसांनी भोंदू तुकाराम महाराजाचा भांडाफोड केला़ दरम्यान, पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)