बिथरलेला गवा विहिरीत पडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:40 AM2021-01-13T05:40:09+5:302021-01-13T05:40:09+5:30
महाबळेश्वर : महाबळेश्वर-पाचगणी मार्गावर असलेल्या लिंगमळा येथील एका विहिरीत रविवारी दुपारी महाकाय गवा पडला. वनविभाग व महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी ...
महाबळेश्वर : महाबळेश्वर-पाचगणी मार्गावर असलेल्या लिंगमळा येथील एका विहिरीत रविवारी दुपारी महाकाय गवा पडला. वनविभाग व महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. रात्री उशिरापर्यंत हे बचावकार्य सुरू होते. याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वरपासून पाच किलोमीटर अंतरावर लिंगमळा येथे ग्रीन वुड सोसायटी आहे. या सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ २० फूट रुंदीची विहीर आहे. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास वेण्णानदी पात्रात एक रानगवा पाणी पिण्यासाठी आला होता. मुख्य रस्ता ओलांडून तो पुन्हा जंगलात जात असताना ग्रीन वुड सोसायटीसमोरच एका अज्ञात वाहनाची त्याला धडक बसली. या धडकेत बिथरलेला गवा ग्रीन वुड सोसायटीत घुसला. कुठेतरी वाट मिळेल या उद्देशाने तो थेट विहिरीच्या दिशेने धावत गेला.
नागरिकांकडून या घटनेची माहिती मिळताच वनकर्मचारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गव्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला; परंतु संरक्षक भिंतीमुळे त्याला बाहेर पडण्याचा रस्ताच सापडला नाही. तो विहिरीच्या अवतीभवती फिरत राहिला व काही क्षणांत विहिरीत कोसळला. वनविभाग व महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी तातडीने बचावकार्यास सुरुवात केली. विहिरीवरील लोखंडी जाळीमुळे गव्याला विहिरीबाहेर काढण्यात अडचणी निर्माण झाल्या. गव्याचा पाण्यात बुडून मृत्यू होण्याची शक्यता निर्माण झाल्याने महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी गवा पाण्यात तरंगत राहावा, यासाठी दोरखंडाच्या साहाय्याने त्याची शिंगे बांधून ठेवली. या गव्याचे वजन लक्षात घेता वनविभागाने एक टन क्षमतेची हायड्रॉलिक क्रेन मागविली असून, कोल्हापूर येथून आपत्कालीन व्यवस्था पाहणारी तज्ज्ञांची टीम बाेलावण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.
या बचावकार्यात वनकर्मचाऱ्यांसह महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनील भाटिया, नगरसेवक कुमार शिंदे, अनिल केळगणे, नीलेश बावळेकर, प्रशांत आखाडे, संजय शिंदे, देवेंद्र्र चौरसिया, संदेश भिसे, अनिल भिलारे, अंकुश बावळेकर यांनी सहभाग घेतला. या गव्याला पाहण्यासाठी विहिरीच्या परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती.
फोटो : १० महाबळेश्वर
महाबळेश्वर-पाचगणी मार्गावर असलेल्या लिंगमळा येथील एका विहिरीत पडलेल्या गव्याला बाहेर काढण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. (छाया : अजित जाधव)