दुर्मिळ मांडूळाची तस्करी करणाऱ्याला पकडले
By admin | Published: July 24, 2015 10:13 PM2015-07-24T22:13:27+5:302015-07-25T01:13:30+5:30
भुर्इंज पोलिसांची आनेवाडी टोलनाक्यावर कारवाई
भुर्इंज : मांडुळाची तस्करी करणाऱ्या एकाला येथील आनेवाडी टोलनाक्यावर पकडण्यात पोलिसांना यश आले. तर एकजण पळून गेला. ते दोघे पुण्याहून कऱ्हाडला दुचाकीवरून जात होते. अटक केलेल्या संशयिताने मांडुळाची तस्करी करत असल्याची कबुली पोलिसांकडे दिली असून, यामध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
याबाबत भुर्इंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आनेवाडी टोलनाक्याहून दुचाकीवरून दोन युवक पुण्याहून कऱ्हाडकडे भरधाव वेगाने निघाले होते. त्यांच्याजवळ असलेल्या बॉक्समध्ये काही तरी असल्याचा पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु न थांबताच दोघेही सुसाट वेगात निघून गेले. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून काही अंतरावर त्यांची दुचाकी पकडली. मात्र एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी बळीराम गोरख शिंदे (रा. कळंब, जि. उस्मानाबाद) याला पकडल्यानंतर त्याच्याजवळील बॉक्स उघडण्यात आला. त्यामध्ये भले मोठे मांडूळ होते. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता मांडूळ पुण्याहून कऱ्हाडला नेत असल्याचे त्याने सांगितले. परंतु तो कऱ्हाडमध्ये मांडूळ कोणाला विकणार होता, हे अद्याप पोलिसांच्या तपासातून समोर आले नाही. जप्त केलेले मांडूळ वनरक्षकांकडे देण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली
आहे. (वार्ताहर)