शालेय परिपाठाबरोबरच मिळतात संगीत शिक्षणाचेही धडे
By admin | Published: June 28, 2016 10:31 PM2016-06-28T22:31:48+5:302016-06-28T22:33:04+5:30
वाग्देव विद्यालय : २५ तबला तर २५ हार्मोनियम वादकांना दिले जाते प्रशिक्षण - अशी ही शाळा जगावेगळी
संजय कदम -वाठार स्टेशन कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील आदर्श शिक्षण संकुल म्हणून परिचित असलेल्या वाठार स्टेशन येथील वाग्देव विद्यालयात बुद्धिवंत संस्कारमय विद्यार्थी घडवण्याबरोबरच या विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रतिवर्षी ५० मुला-मुलींना तबला, हार्मोनियमचे प्रशिक्षण दिले जाते. या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे एक संगीत परंपरा जपणारी व जोपासणारी शाळा म्हणूनच या शाळेची वेगळी ओळख सातारा जिल्ह्यात आहे.
वाठार नगरीचे आराध्य दैवत समर्थ वाग्देव महाराजांच्या नावाने सुरू असलेल्या वाग्देव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या शाळेत दोन हजारांहून अधिक मुले-मुली सर्वप्रकारचे शिक्षण घेत आहेत. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार घडवणाऱ्या या शाळेत सकाळच्या कामाची सुरुवातच संगीतमय परिपाठाने होते. यावेळी एकूण ५० मुले-मुली तबला-हार्मोनियम वादन करून प्रार्थना,भक्तिगीताचे गायन करतात. संगीताचे विशेष शिक्षण देताना या मुलांना शासनमान्य गंधर्व विद्यालयाच्या संगीताच्या परीक्षा घेतल्या जातात यासाठी वाग्देव भक्तिमंच निर्माण करण्यात आला असून, शाळेच्या या उपक्रमाची परिसरातील गावांना ओळख व्हावी यासाठी हा कलामंच परिसरातील गावात समाजप्रबोधन,भारुड, मुखनाट्य, अभंग व भक्तिगीतांचे सादरीकरण करत आहे. या उपक्रमास लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
गुणवत्ता प्रदान शिक्षण देताना या शाळेच्या विद्यार्थ्यांना बाह्यज्ञान आत्मसात करता यावे यासाठी विशेष प्रयत्न या शाळेमार्फत करण्यात येत आहेत. स्पर्धा परीक्षा तसेच विविध प्रकारच्या खेळांच्या माध्यमातून या शाळेने अत्तापर्यंत अनेक बक्षिसे मिळविली आहेत. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या या शाळेत प्रतिवर्षीच्या यशस्वी गुणवंतांचा गुणगौरव वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून या शाळेमार्फत केला जातो.
या शिवाय आपण ज्या शाळेत शिकलो, घडलो, बागडलो व ज्यांनी आपल्याला घडवले अशा शिक्षकांचा सन्मान या शाळेतील शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थी संघा मार्फत वेळोवेळी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून केला जातो. अशा संस्कार परंपरा जपणाऱ्या या शाळेस या गावकऱ्यांचेही मोठे पाठबळ मिळत आहे.
संगीत विशारद व राज्यात देशात तबला वादनाचे शेकडो पुरस्कार मिळविलेले सुनील राजे यांनी या शाळेत अनेकांना तबला विशारद बनवले. आज ते जरी या शाळेत नसले तरी या शाळेत कार्यरत असलेले संगीत शिक्षक व महाराष्ट्रातील प्रसिद्ध मृदंगवादक मदन कदम, प्रा. डी. के. भिसे व दिलीपकुमार धुमाळ यांच्या माध्यमातून कला-क्रीडा संस्कृतीचा हा वारसा ही शाळा जोपासत आहे.
राज्य शासनाने कल चाचणीद्वारे विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा उपक्रम नुकताच सुरू केला आहे. परंतु यापुर्वीच या विद्यालयाने असे अनेक उपक्रम सुरू केले आहेत.
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ शालेय ज्ञान ही एकमेव गोष्ट आवश्यक नाही तर आजच्या स्पर्धेच्या युगात लागणारे संगणकीय ज्ञान त्याला अवगत झाले पाहिजे यासाठी या शाळेने संगणक शिक्षणावर भर दिला आहे. याशिवाय विद्यार्थी संस्कारमय व्हावा त्याच्यातील कला गुणांना वाव मिळावा यासाठी या शाळेत प्रतिवर्षी ५० मुला-मुलींना संगीताचे शिक्षण मोफत दिले जात आहे.
- ज्योती पंडित, प्राचार्या,
वाग्देव हायस्कूल, वाठार स्टेशन