परिवहनकडून ‘स्कूलबस’ची तपासणी !
By admin | Published: May 6, 2016 12:16 AM2016-05-06T00:16:49+5:302016-05-06T01:20:17+5:30
वीस दिवस मोहीम : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कार्यवाही
कऱ्हाड : शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी येथील उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. २० मे पर्यंत ही मोहीम सुरू राहणार असून, ही तपासणी मोफत होणार आहे. कऱ्हाड शहर व तालुक्यात शेकडो शाळा आहेत. यामध्ये शहरासह ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तालुक्यात १९१ स्कूल बसेस व स्कूल व्हॅनच्या माध्यमातून विद्यार्थी वाहतूक होत आहे. विद्यार्थी वाहतूक सुरक्षेला विशेष महत्त्व देताना विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस, स्कूल व्हॅनची तपासणी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला असून, कऱ्हाड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत एक मे पासून ही तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. दि. २० मे पर्यंत स्कूल बस व स्कूल व्हॅनची तपासणी करण्यात येणार असून, ही तपासणी पूर्ण मोफत होणार आहे. तपासणी वाहनधारकांसाठी सक्तीची आहे. या कालावधीत स्कूल बस व स्कूल व्हॅनची तपासणी करून घेणार नाहीत त्या वाहनांवर २० मे नंतर कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईअंतर्गत संबंधित स्कूल बस अथवा स्कूल व्हॅन मालकांवर दंडात्मक कारवाईबरोबरच ते वाहन उपप्रादेशिक परिवहन विभाग ताब्यात घेणार आहे. (प्रतिनिधी)
पंचवीस बाबींची तपासणी
तपासणी झालेल्या वाहनांना तपासणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. वाहनाची गती मर्यादा आपत्कालीन दरवाजा व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था, बैठक व्यवस्था, दफ्तर ठेवण्यासाठीचा रॅक आदी २५ बाबी तपासण्यात येत आहेत.
असुरक्षित विद्यार्थी वाहतुकीमुळे पालकांमध्येही नेहमीच चिंतेचे वातावरण असते. त्या अनुषंगाने विद्यार्थी वाहतूक करणारे वाहन सुस्थितीत आहे का, याची तपासणी करण्यात येत आहे.
- स्टिव्हन अल्वारीस,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी