शाळाच झाल्या पूरग्रस्तांसाठी आश्रयस्थान, महापुरात दिला निवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 06:39 PM2019-08-14T18:39:38+5:302019-08-14T18:41:56+5:30
सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे कृष्णा व कोयना नदीला पूर आल्याने अनेक गावे आणि शहरांमध्ये पुराचे पाणी शिरले. घरे पाण्याखाली गेल्याने संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना प्रशासनाच्या वतीने बाहेर काढून शाळेत स्थलांतर केले. त्यांच्यासाठी पूर ओसरेपर्यंत शाळेत तात्पुरती निवाऱ्याची सोय केली गेल्याने त्यांच्यासाठी शाळा जणू काही आश्रयस्थळे झाली होती. या ठिकाणी जेवण, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा देण्यात आल्या होत्या.
सातारा : जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे कृष्णा व कोयना नदीला पूर आल्याने अनेक गावे आणि शहरांमध्ये पुराचे पाणी शिरले. घरे पाण्याखाली गेल्याने संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना प्रशासनाच्या वतीने बाहेर काढून शाळेत स्थलांतर केले. त्यांच्यासाठी पूर ओसरेपर्यंत शाळेत तात्पुरती निवाऱ्याची सोय केली गेल्याने त्यांच्यासाठी शाळा जणू काही आश्रयस्थळे झाली होती. या ठिकाणी जेवण, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा देण्यात आल्या होत्या.
सातारा जिल्ह्यातील कृष्णा व कोयना नद्यांना आलेल्या महापुराने नदीकाठच्या गावांना विळखा घातला होता. बघता बघता शेती, जनावरांचे गोठे आणि त्यानंतर घरात पाणी शिरल्याने हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना एनडीआरएफच्या जवानांनी बोटीच्या साह्याने सुरक्षित स्थळी हलवले. अशावेळी कोणत्याही वस्तू न घेता मोकळ्या हाताने ते घराबाहेर पडले.
पुरात गावातील मंदिरे, घरे पाण्यात गेली होती. नातेवाइकांकडे जायचे तर अनेक रस्ते आणि त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने बहुसंख्य रस्त्यावरून वाहतूक बंद करण्यात आली होती. अशा गंभीर परिस्थितीत पूरग्रस्तांचे स्थलांतर करायचे तरी कोठे? असा गंभीर प्रश्न प्रशासनासमोर होता. मात्र, ज्ञानदानाचे काम करणारी मंदिरे असलेल्या शाळा मात्र भक्कमपणे उभ्या होत्या.
ज्या शाळांमध्ये गमभन शिकवलं जातं, त्या शाळा पूरपरिस्थितीमध्ये पूरग्रस्तांचे घर बनल्या होत्या. या शाळांमध्ये या पूरग्रस्तांना जिल्हा प्रशासनाकडून दोन वेळचे जेवण, पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात आला होता. पुरामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने रोगराई पसरू नये म्हणून आरोग्य विभागाची पथके कार्यान्वित करण्यात आली होती.
या पुरात आयुष्यभर काबाडकष्ट करून उभारलेला संसार वाहून गेला होता. घर वाहून गेली, काहींची पडझड झाली, जनावरे मृत्युमुखी पडली. तर काहींची स्वप्नेही वाहून गेली होती. या शाळारुपी घरात पूर ओसरेपर्यंत गावातील सर्व जाती-धर्म, गरीब, श्रीमंत एकत्र रााहिले. अशा संकटप्रसंगी सर्वांची समान संकट आल्याने त्यांनी एकमेकांना आधार दिला. या संकटातून सावरण्यासाठी आत्मबल वाढविण्यासाठी गुजगोष्टी केल्या. तसेच आपल्या कच्चाबच्च्यांना घासातला घास भरवून माणुसकीचे दर्शन घडवले.
पूरग्रस्तांना मदतीचा हात
अनेकजण संकटात सापडल्याचे पाहून अनेकांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला. आपापल्या परीने जास्त मदत करून पूरग्रस्तांचे संसार सावरण्यासाठी मदत केली. तसेच जीवनावश्यक वस्तू दिल्या. त्यामध्ये तांदूळ, डाळ, बिस्किटे, पाणी, कपडे आदी साहित्यांचा समावेश होता.
आम्ही कधीच शाळेत गेलो नायं; पण या पुरानं शाळंत आणलं. घर अन् संसार पाण्यात गेल्यानं दु:खात होतो; पण गावतच्या आणि भावकीतल्या लोकांसोबत असल्यानं आम्हाला काही प्रमाणात आधार मिळाला. सारखी चिंता लागून राहिली व्हती; पण शाळेतील चित्र आणि बाकी सर्वांचा आधार बघून चित्त वळून जायचं
-जननाथ कसबे
पोतले, ता. कऱ्हाड