शाळेचे बेंच जाळून चक्क ओली पार्टी

By admin | Published: December 7, 2015 10:18 PM2015-12-07T22:18:55+5:302015-12-08T00:33:44+5:30

नांदगावातील धक्कादायक प्रकार : संस्थाचालक हतबल; दोषींवर कारवाई करण्याची शिक्षणप्रेमींची मागणी--लोकमत विशेष

School Oven Party Burns | शाळेचे बेंच जाळून चक्क ओली पार्टी

शाळेचे बेंच जाळून चक्क ओली पार्टी

Next

कऱ्हाड : रात्रीच्या वेळी माळरानावर जायचं. तीन दगडांची चूल मांडायची. त्यावर मांसाहरी जेवण शिजवायचं अन् गरमागरम जेवणावर ताव मारायचा हा प्रकार नवीन नाही; पण त्यासाठी लागणारं जळण म्हणून चक्क हायस्कूलमधील बेंच जाळल्याचा धक्कादायक प्रकार नांदगावात चव्हाट्यावर आला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांत संतापाचे वातावरण असून, संस्थाचालक हतबल असल्याचे चित्र दिसत आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी संस्थाचालकांसह ग्रामस्थांनी केली आहे.
नांदगाव येथील पोलीस दुरक्षेत्रालगतच दक्षिण मांड व्हॅली शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल हे हायस्कूल आहे. येथे पाचवी ते दहावी पर्यंतचे वर्ग भरतात. किरकोळ नादरुस्त झालेले सुमारे ४० ते ५० बेंच दुरुस्तीसाठी व्हरांड्यात ठेवण्यात आलेले होते.
त्यातील काही साहित्य कमी होत चालल्याचे यापूर्वी लक्षात आले; पण नक्की याची चोरी कोण व कशासाठी करत आहे, हे शिक्षक व कर्मचाऱ्यांना समजून येत नव्हते. अखेर गत आठवड्यात एका व्यक्तीने नांदगाव संजयनगर रस्त्यालगत एका विहिरीजवळ शाळेच्या बेंचची लाकडे पडल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचारी बरोबर घेऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. त्यानंतर पोलीस पाटील व तंटामुक्तीचे अध्यक्ष यांना ही बाब दाखवून दिली. घटनेची माहिती पोलिसांनाही देण्यात आली. मात्र, पोलीस येईपर्यंत ही बाब संबधितांच्या लक्षात येताच त्यांनी लाकडे तत्काळ हलविली.
मात्र घटनास्थळाचे फोटो घेतल्याने पार्ट्यांत रमलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, या प्रकाराबाबत संस्थेच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, नांदगावचे पोलीस याचा तपास करीत आहेत. पोलिसांनी याचा सखोल तपास करावा, व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.खरं तर एक बेंच बनवायला सुमारे तीन हजारांच्या आसपास खर्च येतो. या जुन्या किरकोळ नादुरुस्त बेंचपासून अनेक चांगले बेंच तयार होऊ शकतात. पण काहींनी चोरी करून याचा वापर पार्ट्यांच्या जळणासाठी केल्याने संस्थेचे नुकसान झाले आहे. त्याला जबाबदार कोण? आपल्याच गावातील शाळेच्या फर्निचरचा असा दुरूपयोग करणाऱ्यांची प्रवृत्ती नेमकी काय? असा सवालही येथील ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)


शिक्षण संस्थेने घडलेली घटना सांगितल्यानंतर आम्ही जागेवर जाऊन त्याची पाहणी केली. तेथील लाकडांच्या फळ्यावर विद्यालयाचे लिहिलेले नाव दिसत होते. ही घटना नांदगावला गालबोट लावणारी आहे. त्यामुळे याचा तपास सखोल करण्यासाठी पोलिसांना विनंती केली आहे.
- दिलीप पाटील,
पोलीस पाटील, नांदगाव

संगणक चोरी : तपास सुरू आहे !

विद्यालयातून यापूर्वीही अनेकदा अनेक वस्तुंची चोरी झाली आहे. त्यामध्ये संगणक चोरीचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. त्या त्यावेळी संस्थेने पोलिसांत तक्रारही केली आहे. मात्र, त्याचा तपास काही लागलाच नाही. यावेळी तरी पोलीस तपास करून संबंधितांपर्यंत पोहोचणार का? याबाबत शिक्षणपे्रमींना उत्सुकता आहे.

Web Title: School Oven Party Burns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.