शाळेत स्वाईन.. पालकांना सलाईन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:05 PM2018-09-26T23:05:44+5:302018-09-26T23:05:48+5:30
सातारा : स्वाईन फ्लूने सर्वत्र थैमान घातले असतानाच साताऱ्यातही रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना सातारकर काळजी घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून व्हायरल फिव्हरच्या साथीने बालके आजारी आहेत. त्यातच शाळांमध्ये असे विद्यार्थी येत असल्यामुळे सर्दी खोकल्याचा संसर्ग वाढत आहे. सामान्य सर्दी, खोकलाही अनेकांना स्वाईन दिसू लागल्याने मुलांच्या काळजीने पालकांनाच सलाईन लावायची वेळ आली आहे. दरम्यान, स्वाईनच्या पार्श्वभूमीवर निवासी शाळा असलेल्या सैनिक स्कूलला २ आॅक्टोबरपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांत शाळेतील विद्यार्थ्यांना संसर्गाच्या आजारांने ग्रासले आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडू नये म्हणून पालक आजारी विद्यार्थ्यांनाही शाळेत पाठवत असल्यामुळे याचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन आणि पालक यांच्यात एकमत होत नसल्यामुळे अनेक शाळांमध्ये खटके उडत आहेत. काही शाळेतील पालकांनी स्वाईनच्या भीतीपोटी शाळेला सुटी देण्याची मागणी मुख्याध्यापकांकडे केली. पालक संघटित होऊन शाळा प्रशासनला टार्गेट करत असल्याचा आक्षेप नोंदवत प्रसंगी विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढण्याची भाषा काही शाळांकडून वापरण्यात आली. शाळेला आणीबाणीच्या प्रसंगात जिल्हाधिकाºयांना स्थानिक सुटी देण्याचा अधिकार आहे. शाळेतील काही आजारी विद्यार्थ्यांसाठी अवघी शाळा बंद ठेवणं हा पर्याय नाही, असे शाळा व्यवस्थापनाचे म्हणणे पडले.
एका हाताने अभ्यास
दुसºयाने कापराचा वास
सातारा शहर व परिसरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये स्वाईन फ्लूची दहशत चांगलीच वाढली आहे. त्यामुळे अनेक पालक विद्यार्थ्यांना शाळेत जाताना रुमालात कापूर किंवा नीलगिरीचे तेल देतात. दर पाच ते सात मिनिटांनी याचा वास घ्या, अशी सक्त ताकीद असल्यामुळे मुलं वर्गात एका हाताने अभ्यास करतात तर दुसºया हाताने कापराचा वास घेत असल्याचे चित्र शाळेत डोकावल्यावर दिसते.
‘स्वाईन’मुळे सैनिक स्कूलला दोन आॅक्टोबरपर्यंत सुटी
सैनिक स्कूलमध्ये संसर्गजन्य आजारांची साथ वाढली आहे. गेल्या आठवड्यात तीन विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लूसदृश्य आजारांची लागण झाल्यानंतर स्कूल प्रशासनाने दि. २ आॅक्टोबरपर्यंत सुटी जाहीर केली आहे.
सातारा सैनिक स्कूलमध्ये सध्या ६२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गणेशोत्सवादरम्यान, शाळेतील विद्यार्थ्यांना साथीच्या आजारांमुळे थंडी, ताप, घशात खवखवणे आदी लक्षणे जाणवू लागली. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वैद्यकीय तपासणीमध्ये ही बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर प्रशासनाने काही विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी तीन विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लूसदृश्य आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करून त्यांना सोडण्यात आले. त्याचबरोबर शाळेतील इतर विद्यार्थ्यांमध्येही अशा प्रकारची लक्षणे आढळून आल्याने प्रशासनाने तातडीने जिल्हा आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि संरक्षण दलाची परवानगी घेऊन स्कूल सुटी जाहीर केली. वैद्यकीय विभागाकडून शिक्षक, कर्मचारी यांचीही आरोग्य तपासणी करून आवश्यक रुग्णांना योग्य उपचार करण्यात आले आहेत.