चिमुकल्यांची आता झोपमोड होणार नाही, पूर्व प्राथमिक ते चौथीच्या शाळेची वेळ बदलली
By प्रगती पाटील | Published: June 14, 2024 04:42 PM2024-06-14T16:42:08+5:302024-06-14T16:42:39+5:30
सातारा : सकाळी लवकर शाळा असल्यामुळे झोप होत नसल्याने शाळेची वेळा बदलण्यात यावी अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी ...
सातारा : सकाळी लवकर शाळा असल्यामुळे झोप होत नसल्याने शाळेची वेळा बदलण्यात यावी अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी नऊ किंवा त्यानंतर भरवावेत असे आदेश परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत.
शासनामार्फत राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ सकाळी नऊच्या आधी आहे. त्या शाळांनी नवीन येणारे शैक्षणिक वर्षापासून पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्याची वेळ सकाळी नऊ किंवा नऊ नंतर ठेवावी. शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन व अध्यापनाचा निश्चित केलेला कालावधी कमी होणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घेण्याच्या सूचनाही या परिपत्रकात केल्या आहेत.
विद्यार्थ्यांप्रती राज्यपालांची संवेदनशीलता
शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत ५ डिसेंबर २०२३ रोजी राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात दरम्यान राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांच्या भाषणामध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याच्या सूचना केल्या होत्या. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयाच्या वतीने राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी विविध शिक्षण तज्ञ, शिक्षण प्रेमी, पालक तसेच प्रशासनातील विविध अधिकारी यांचे अभिप्राय मागवून सकाळी सात नंतर भरणाऱ्या शाळेच्या वेळेमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर नकारात्मक परिणाम होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. त्या अनुषंगाने शासना मार्फत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळांची वेळ बदलणे शक्य होत नसेल त्यांच्या अडचणी गटशिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक यांनी मार्गदर्शन देऊन सोडवण्याची तजवीज आहे. यासाठी शाळेच्या व्यवस्थापनाने कार्यालयाशी संपर्क साधून मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी. सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी नऊ नंतर वर्ग न भरवण्यासाठी कोणताही आड मार्ग निवडू नये. तसे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. - शबनम मुजावर, प्राथमिक शिक्षणाधिकारी