शालेय गणवेशाचे फलक दुकानदारांनी स्वत:हून काढले-उघड-उघड गणवेश देणे बंद : मागील दरवाजाने दुकानात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 11:41 PM2018-06-16T23:41:34+5:302018-06-16T23:41:34+5:30
गणवेश सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाईचे संकेत माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दिल्यानंतर शहरातील दुकानांसमोर लावलेले फलक हटविण्यात आले आहेत.
सातारा : गणवेश सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाईचे संकेत माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दिल्यानंतर शहरातील दुकानांसमोर लावलेले फलक हटविण्यात आले आहेत. तर उघड-उघड गणवेश देणे दुकानदारांनी बंद केले आहे.
दरवर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेचे गणवेश आमच्या दुकानात मिळतील, असे फलक लावले जात होते.
यंदाही ही तयारी जवळपास दुकानदारांची पूर्ण झाली होती. मात्र, एका कापड दुकानदाराने शाळा व्यवस्थापन आणि दुकानदारांचे असलेले साटेलोटे उघडकीस आणले. एवढेच नव्हे तर गणवेशातून होत असलेली आर्थिक उलाढालीचे दुकानदार आणि पालकाचे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे दुकानदारांची मोठी पंचायत झाली. त्यातच ‘लोकमत’ने हे प्रकरण लावून धरल्याने दुकानदारांना काहीच हालचाल करता आली नाही.
शाळा सुरू होण्यापूर्वी दोन दिवस अगोदर दुकानाच्या मागच्या दाराने पालकांना गणवेश घेण्यासाठी प्रवेश दिला जात होता. उघड-उघड गणवेश देणे बंद केले होते. एवढेच नव्हे तर काचेमध्ये लावलेले गणवेश काढण्यात आले होते; परंतु आतल्या मार्गाने मुलांच्या पालकांना गणवेश दिले जात असल्याचे दिसून येत होते.
माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी मुख्याध्यापकांना नोटिसा देण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर दुकानदारांचे धाबे दणाणले. आपापल्या दुकानासमोर अमूक शाळेचे गणवेश मिळतील, असे लावण्यात आलेले फलक दुकानदारांनी कारवाईच्या धास्तीने तत्काळ काढून घेतले.शुक्रवारपासून शाळा सुरू झाल्या असल्या तरी अनेक पालकांनी आपल्या मुलाला अद्याप गणवेश घेतला नाही. शाळा पुन्हा यावर काही तरी विचार करेल, या आशेवर अनेक पालक आहेत.
कामगारावर वेगळीच जबाबदारी..
दुकानांसमोरील फलक काढून घेण्यात आल्यामुळे अनेक पालक संभ्रमात पडत होते. शाळांनी पालकांना दुकानाचा पत्ता दिला होता. मात्र, दुकानासमोर शाळेचा गणवेश आणि फलक दिसत नसल्यामुळे पालक बुचकाळ्यात पडत होते. काही दुकानांसमोर एक कामगार ठेवण्यात आला होता. हा कामगार विचारपूस करून पालकांना दुकानात सोडत असल्याचे चित्र साताºयात अनेक ठिकाणी पाहायला मिळाले.