शाळा करणार जुन्या पुस्तकांची खरेदी, पालकांना देणार मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:26 AM2021-06-26T04:26:43+5:302021-06-26T04:26:43+5:30
सातारा : कोविडमुळे पालकांची विस्कटलेली आर्थिक घडी लक्षात घेऊन येथील गुरुकुल स्कूलने शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांची पुस्तके दान करण्याचे आवाहन ...
सातारा : कोविडमुळे पालकांची विस्कटलेली आर्थिक घडी लक्षात घेऊन येथील गुरुकुल स्कूलने शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांची पुस्तके दान करण्याचे आवाहन केले आहे. ज्या पालकांना पुस्तके फुकट देणं शक्य नाही त्यांच्याकडून व्यवस्थापन योग्य मोबदला देऊन ही पुस्तके शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत देणार आहे.
कोविडमुळे अनेक पालकांचा आर्थिक स्तर खालावला आहे. दैनंदिन खर्चाबरोबरच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक खर्च आणि कुटुंबातील आजारपण सांभाळणं मुश्किल झाल्याचे चित्र घराघरांमध्ये पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने नवी पुस्तकं नाहीत, चला जुनीच वापरू या, मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले. हे वृत्त मुख्याध्यापिका शीला वेल्लाळ यांनी संस्थाचालक राजेंद्र चोरगे यांच्या निदर्शनास आणले. त्यानंतर त्यांनी तातडीने शाळेच्या ग्रुपवर पुस्तक मागविण्याचे आवाहन केले.
मागील शैक्षणिक वर्षात आॅनलाईन अभ्यास झाल्याने विद्यार्थ्यांकडून पुस्तकांचा फारसा वापर झाला नाही. त्यादरम्यान विद्यार्थ्यांनी जी शालेय पुस्तके घेतली होती अधिक चांगल्या स्थितीत असतील. म्हणून शाळेतर्फे पालकांना आपल्या पाल्याची पुस्तके आपल्या शाळेतील त्या, त्या वर्गातील नवीन मुलांना देता येतील, असे आवाहन केले. तुमच्या परिचयातील आपल्या स्कूलच्या विद्यार्थ्यांना योग्य किमतीत किंवा मोफत द्यावीत. पुस्तकांचा पूर्ण सेट असावा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना ती उपयोगात आणता येतील. यामुळे नवीन पुस्तकांसाठी होणारा खर्च वाचेल, अशी भूमिका गुरूकुल स्कूलने घेतली आहे.
कोट :
नवीन पुस्तकं घेण्याची काही पालकांची आर्थिक परिस्थिती नाही. पालकांनी याबाबत वर्गशिक्षकांनाही माहिती दिली. त्यामुळे आम्ही पालकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर याबाबत आवाहन केलं. त्याला संवेदनशील पालकांनी उत्तम प्रतिसादही दिला.
- शीला वेल्लाळ, मुख्याध्यापिका
चौकट :
गुरुकुल स्कूलच्या वतीने पालकांना पाल्याची गेल्या वर्षीची शैक्षणिक पुस्तके दान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. याला पालकांनी चांगला प्रतिसादही दिला. गेल्या दोन दिवसांत ४०हून अधिक पालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुस्तके शाळेमध्ये येऊन जमा केली आहेत. हीच पुस्तके गरज आणि आवश्यकतेनुसार इतर विद्यार्थी मोफत घेऊन जात आहेत. तर काही पालकांनी शाळेत पुस्तके आणून देण्याची ग्वाहीही दिली आहे.
फोटो ओळ
सातारा येथील गुरूकुल स्कूलमध्ये पालकांनी आपल्या पाल्याची पुस्तके शाळेत आणून जमा केली.