अनलॉकमध्येही शाळा राहणार लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:49 AM2021-06-16T04:49:47+5:302021-06-16T04:49:47+5:30
सातारा : कोरोनामुळे शासनाने अनलॉक जाहीर केले असले तरी अद्याप शाळा मात्र ‘लॉक’च आहेत. मुलांचे शैक्षणिकदृष्ट्या नुकसान होऊ नये ...
सातारा : कोरोनामुळे शासनाने अनलॉक जाहीर केले असले तरी अद्याप शाळा मात्र ‘लॉक’च आहेत. मुलांचे शैक्षणिकदृष्ट्या नुकसान होऊ नये यासाठी गतवर्षीप्रमाणे या वर्षीही आॅनलाइन अध्यापन पद्धतीचाच अवलंब केला जाणार असून, त्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. लवकरच जिल्हापातळीवर निर्णय होऊन आठवडाभरात शाळेची आॅनलाइन घंटा वाजण्याची शक्यता आहे.
गतवर्षी मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला व शाळा बंद झाल्या. जुलैपासून आॅनलाइन अध्यापन सुरू करण्यात आले. नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंत, तर जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली. टप्याटप्याने शाळा सुरू झाल्या; मात्र वार्षिक परीक्षा सुरू होण्यापूर्वीच पुन्हा कोरोना रुग्णसंख्येच्या उद्रेकामुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्यात आले. अद्याप मुलांच्या हातात निकालपत्र मात्र मिळालेले नाही. लॉकडाऊन संपून आता अनलॉक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे लॉक असलेल्या शाळा आता ह्यअनलॉकह्ण होणार आहेत.
काही शाळांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या शाळांमध्ये प्रत्यक्षात शिक्षक जाणे शक्य नाही. त्यामुळे आॅनलाइन अध्यापन पद्धतीचा निर्णय झाला तरी शिक्षकांना घरातूनच मुलांना आॅनलाइन अध्यापन करावे लागणार आहे.
शिक्षण विभागातर्फे लवकरच शाळांना आॅनलाइन अध्यापन सुरू करण्याबाबत सूचना करण्यात येणार आहेत. पालकांमधूनही मुलांच्या सुरक्षेसाठी आॅनलाइन अध्यापन पद्धतीचे स्वागत केले जात आहे.
आॅनलाइन अध्यापन पद्धत
विद्यार्थी आरोग्य सुरक्षितता लक्षात घेत शासनाने यंदाचे शैक्षणिक वर्ष आॅनलाइन सुरू करण्याचा निर्णय घेत आहे. दि. १५ जूनपासून आॅनलाइन पद्धतीने शाळा सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. सोमवारी जिल्ह्यातील शाळांनाही आॅनलाइन पद्धतीने अध्यापन करण्याच्या सूचना करण्यात येणार आहेत. मात्र ज्या गावात नेटवर्कचा अभाव आहे, तेथे मात्र शाळा व्यवस्थापन समितीच्या मागर्गदर्शनाखाली निर्णय घेण्यात येणार आहे.
- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी, सातारा
गुरुजींची शाळा सुरू होणार...?
- अद्याप अनेक शिक्षक कोरोनामुळे प्रशासनाच्या सूचनेनुसार कोविड ड्युटीवर आहेत.
- विलगीकरण कक्ष काही शाळांमध्ये असल्याने अध्यापनासाठी शाळेत जाणे शक्य नाही.
- एका विषयाला किती तासिका द्याव्यात, त्याची चाचणी, स्वाध्याय, गृहपाठ यांचे नियोजन कसे करावे याबाबत सूचना अपेक्षित आहेत.
शाळा सुरू करायची म्हटलं तर
सद्य:स्थितीत प्रत्यक्ष शाळा/वर्ग सुरू करणे शक्य नाही. शिवाय अध्यापनासाठी शाळेत जाणे सद्य:स्थितीत अशक्य आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये विलगीकरण कक्ष, कोरोना तपासणी केंद्र उभारण्यात आले आहेत. अद्याप कोरोना रुग्ण या ठिकाणी असल्याने शाळेत जाणे शक्य नाही. त्यामुळे आॅनलाइन अध्यापन पद्धतीचा पर्याय योग्य आहे. मात्र, त्यासाठी गुगल क्लास रूम, गुगल मीटचा वापर शक्य आहे. के.जी. तसेच पहिली ते दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पाठाचे व्हिडिओ तयार करून त्याद्वारे अध्यापन योग्य राहील. प्रथम सत्रानंतरच प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत तरी आॅनलाइन अध्यापन पद्धतीनेच अध्यापन सुरू होणार आहे.