औंधमधील शाळा, महाविद्यालये आज सुरू
By admin | Published: October 2, 2016 12:47 AM2016-10-02T00:47:09+5:302016-10-02T00:47:09+5:30
महामोर्चासाठी उद्या सुटी : युवतींचा उत्साह शिगेला; महिलांसाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था
औंध : येथे मराठा क्रांती महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी व शनिवारी बैठका घेऊन औंध भागातून महामोर्चामध्ये विक्रमी संख्येने सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी महामोर्चाचा मार्ग, आचारसंहितेच्या पालनाची माहिती देण्यात आली.
औंध परिसरातील कॉलेज, शाळेतील विद्यार्थ्यांना महामोर्चाची सविस्तर माहिती देण्यात आली. औंध भागातून मोठ्या प्रमाणात कॉलेज युवक, युवतींनी या महामोर्चामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून, अनेक ठिकाणी महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर रविवारी शाळा, कॉलेजचे कामकाज सुरू राहणार असून, सोमवारी सुटी देण्यात आली आहे.
कोपर्डी घटनेचा निषेध, मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्यासाठी व अन्य मागण्यांसाठी हा महामोर्चा काढला जाणार असून, औंधसह परिसरातील तसेच खटाव तालुक्यातील अनेक गावे, वाड्या-वस्त्यांवर वेगवेगळ्या प्रकारे जनजागरण अभियान राबविले जात आहे. कोणाचीही गैरसोय होऊ नये म्हणून सर्व ती खबरदारी उपाययोजना केल्या जात आहे. समाजामध्ये जनजागृती व्हावी, तळागाळापर्यंत महामोर्चा संदेश पोहोचावा, औंध गावातील तरुणाईने गावातून तसेच पंचक्रोशीतून भव्य दुचाकी रॅली काढली तसेच औंध येथील संपर्क कार्यालयात उपस्थित राहून महामोर्चाला पाठिंबा दिला.(वार्ताहर)
महामोर्चासाठी असे असेल पार्किंग
सातारा : साताऱ्यात सोमवारी होणाऱ्या महामोर्चासाठी पोलिसांनी पार्किंग व्यवस्थेचे नियोजन केले असून, नागरिकांनी वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कऱ्हाड-पाटणची
वाहने झेडपीवर!
कऱ्हाड-पाटण आणि बोरगाव या बाजूकडून येणाऱ्या महिला या जिल्हा परिषद क्रीडांगण व पुरुष सैनिक स्कूल क्रीडांगण येथे जमा होतील. रहिमतपूर बाजूकडून महामोर्चासाठी येणारी वाहने ही गणेश चौकात एमआयडीसीमध्ये प्रवेश करतील. देगाव फाटा येथे लोकांना वाहनातून उतरविले जाईल. हॉटेल फुलोरा ते चौगुले कंपनी, फतेजा कंपनी ते महाराष्ट्र स्कूटर्स रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहने पार्क करतील. कोडोली शाळेच्या मैदानावर वाहने पार्क करण्यात येतील.
कऱ्हाडहून येणाऱ्या वाहनांना शाहूनगरमध्ये पार्किंग!
कऱ्हाड-पाटण, बोरगाव बाजूकडून महामोर्चासाठी येणारी सर्व वाहने ही शिवराज पेट्रोलपंप, हॉटेल मराठा पॅलेस मार्गे शहरात येतील व त्यांच्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. पेरेन्ट स्कूल सातारा, शाहूनगर येथील पोलिस मैदान, पशुसवर्धन वळू केंद्र कार्यालयातील मोकळी जागा, गोडोली येथील रजिस्टर आॅफिस पार्किंग पशुसंवर्धन केंद्र, खिंडवाडी ते कणसे ढाब्यासमोरील पश्चिमेकडील हायवे सर्व्हिस रोड, एसपीएस कॉलेज मागील बाजूस, अजिंक्यतारा सूतगिरणी परिसर, शेंद्रे फाटा ते बोगदा रोड आदी ठिकाणी वाहने पार्क करून लोकांनी चालत महामोर्चाच्या ठिकाणी पोहोचायचे आहे.
महामोर्चाची महातयारी
कोरेगावकडून येणारी वाहने कृष्णा खोरे कार्यालय!
रहिमतपूर बाजूकडून येणाऱ्या महिला या जिल्हा परिषद क्रीडांगण व पुरुष सैनिक स्कूल क्रीडांगण येथे जमा होतील. कोरेगाव बाजूकडून येणारी वाहने ही कृष्णा खोरे कार्यालयासमोर लोकांना उतरवून कृष्णा खोरे ग्राउंडवर वाहने पार्किंग करतील.
खंडाळाकडून येणारी वाहने मोना स्कूल मैदान
खंडाळा, वाई, महाबळेश्वर या बाजूंकडून तसेच लिंबखिंड बाजूकडून येणारी वाहने सैनिकनगर चौक येथे थांबतील. मोना स्कूल मैदान व सारंग मंगल कार्यालयाशेजारी वाहने पार्किंग करतील. तसेच मारुती मंदिर, वाढे फाटा चौक येथे लोकांना उतरवून मारुती मंदिराशेजारील मोकळ्या जागेत वाहने पार्क करतील.
महाबळेश्वरची वाहने करंजे नाक्यावर...
खंडाळा, वाई, महाबळेश्वर, पुणे बाजूकडून येणारी सर्व वाहने लिंबखिंड मार्गे पुलाखालून रामनगर वर्ये मार्गे सातारा शहरात येतील. करंजे नाका येथे लोकांना उतरून टीसीपीसी ग्राउंडमध्ये वाहने पार्क करतील, मोळाचा ओढा येथील शिंदे स्टिल फर्निचरच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत वाहने पार्किंग केली जातील. मेढा बाजूकडून येणारी सर्व वाहने ही दिव्यनगरी फाटा येथे लोकांना उतरवून दिव्यनगरीत पार्किंग करतील.
परळी खोऱ्यातील वाहने बोगद्याबाहेर
मेढा बाजूकडून येणाऱ्या महिला या कला, वाणिज्य कॉलेज व पुरुष कोटेश्वर क्रीडांगण येथे जमा होतील. परळी बाजूकडून तसेच कास बाजूकडून येणारी सर्व वाहने बोगद्याच्या बाहेर लोकांना उतरवून कुरणेश्वर मंदिराशेजारून जकातवाडी गावातील ब्रह्मनगरीच्या ग्राउंडवर तसेच बोगद्याचे बाहेरील परळी बाजूकडील माळावरील प्लॉटवर वाहने पार्क करतील.