शाळांना यंदा १२८ दिवस सुट्टी
By प्रगती पाटील | Published: June 13, 2024 05:03 PM2024-06-13T17:03:28+5:302024-06-13T17:03:40+5:30
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांच्या आदेशानुसार माध्यमिक शाळा संहितेच्या नियमानुसार एकूण ७६ सुट्ट्या यंदा शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या आहेत.
सातारा : सातारा जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक वर्षातील सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यंदा विद्यार्थ्यांना १२८ दिवस सुट्ट्या असणार आहेत. यात उन्हाळी सुट्टी, दिवाळी सुट्टी, विविध सण उत्सव यासह रविवारचा समावेश आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांच्या आदेशानुसार माध्यमिक शाळा संहितेच्या नियमानुसार एकूण ७६ सुट्ट्या यंदा शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या आहेत. उन्हाळी सुट्टी २ मे ते १४ जून अशी ४३ दिवसांची आहे. यात साप्ताहिक सुट्ट्या सहा आणि एक शासकीय सुट्टी दिवस असे एकूण ३६ दिवस सुट्टी विद्यार्थ्यांना मिळाली. २८ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर अशी पंधरा दिवसांची विद्यार्थ्यांना दीपावली सुट्टी मिळणार आहे. यात २ रविवार आणि ३ शासकीय सुट्ट्यांचा समावेश आहे.
१. अशी आहे सुट्ट्यांची विभागणी
उन्हाळी सुट्टी ३६ दिवस
दीपावली सुट्टी १० दिवस
सार्वजनिक सुट्ट्या २० दिवस
जिल्हाधिकारी घोषित सुट्ट्या ३ दिवस
शालेय सुट्ट्या ५ दिवस
मुख्याध्यापकांच्या अधिकारातील सुट्टी २ दिवस
२. यासाठी मिळणार शाळांना सुट्ट्या
बुद्ध पौर्णिमा, बकरी ईद, मोहरम, आषाढी एकादशी, स्वातंत्र्यदिन, पारशी नववर्ष दिन, गणेश चतुर्थी, ईद-ए-मिलाद, महात्मा गांधी जयंती, विजयादशमी, लक्ष्मीपूजन, दीपावली पाडवा, गुरुनानक जयंती, नाताळ, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महाशिवरात्री, धुलीवंदन, रमजान ईद, महावीर जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे, महाराष्ट्र दिन .
प्रत्यक्ष कामाचे दिवस : २३७ दिवस
सुट्ट्या : ७६ दिवस
साप्ताहिक सुट्ट्या : ५२ दिवस
सातारा जिल्ह्यातील शाळांना सुट्ट्यांचे नियोजन जाहीर करण्यात आले आहे. यात रक्षाबंधन, घटस्थापना, नरक चतुर्दशी या सुट्ट्या जिल्हाधिकारी यांनी घोषित केलेल्या आहेत. तर बेंदूर, गौरी पूजन, गौरी गणपती उत्सव, अनंत चतुर्दशी आणि मकर संक्रांति या पाच सुट्ट्या शाळांनी जाहीर केलेल्या आहेत. याबरोबरच मुख्याध्यापकांच्या अधिकारातील दोन सुट्ट्या ही शाळांना देण्यात आले आहेत.
- प्रभावती कोळेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी