ट्रीपल इंजिनच्या खोके सरकारमुळे शाळा कमी, दारु दुकाने वाढली : सुप्रिया सुळे
By नितीन काळेल | Published: October 19, 2023 08:35 PM2023-10-19T20:35:11+5:302023-10-19T20:35:40+5:30
येथील शासकीय विश्रामगृहात खासदार सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : राज्यात बेरोजगारी, महागाईसारखी आव्हाने आहेत. मात्र, ट्रीपल इंजिनवाल्या खोके सरकारमुळे शाळा कमी आणि दारुची दुकाने वाढत आहेत. हे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाईंनी आवरावे,’ असा टोला राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.
येथील शासकीय विश्रामगृहात खासदार सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव आदी उपस्थित होते. आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या सातारा दौऱ्यावर आल्या होत्या. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे. येथे अंमलीपदार्थांच्या विरोधात आमची एक महिला भगिनी लढा देत आहे. त्यांना धमकी दिली जात आहे. पण, आम्ही पूर्ण ताकतीने त्यांच्या बाजूने उभे आहोत. राज्यात मोठी आव्हाने असताना खोके सरकार आईसमध्ये (इन्कमटॅक्स, सीबीआय आणि ईडी) व्यस्त आहे. घरफोडी, पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर या देशात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत एकच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून तो शरद पवार यांचाच आहे. मात्र, या खोके सरकारचा दिवस राष्ट्रवादीवर टीका केल्याशिवाय सुरूच होत नाही.
ललित पाटील प्रकरणी खासदार सुळे म्हणाल्या, राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती की त्यांनी स्पष्ट बोलावे. खरे काय ते महाराष्ट्राच्या जनतेला सांगावे. देवेंद्र फडणवीस दोन मिनीटेच पत्रकारांशी बोलले. त्याएेवजी १०-१५ मिनीटे बोलले असते तर राज्यालाही खरे काय ते समजले असते. आता देवेंद्र फडणवीसच गृहमंत्री आहेत. त्यामुळे ललीत पाटील पळून गेला म्हणून त्यांनी याचीही जबादारी घ्यावी.