शाळेतील कपाट चोरट्याने पेटविले
By Admin | Published: July 25, 2015 11:52 PM2015-07-25T23:52:46+5:302015-07-26T00:02:32+5:30
अनर्थ टळला : शिरवळ येथील कन्या शाळेतील घटना
शिरवळ : शिरवळ, ता. खंडाळा येथील मध्यवस्तीत असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा याठिकाणी शनिवारी भरदिवसा अज्ञाताकडून कटावणीने चोरीचा अयशस्वी प्रयत्न करीत रुममधील कपाटांना आग लावण्याचा प्रयत्न झाल्याने शिरवळमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, वर्गामधून धूर येत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येताच प्रसंगावधान दाखवित आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, शिरवळ ता. खंडाळा याठिकाणी मध्यवस्तीत जिल्हा परिषदेची प्राथमिक कन्या शाळा आहे. आज शनिवार असल्याने मुलींना सकाळी साडेनऊपर्यंत शाळा होती. शाळा सुटल्यानंतर मुख्याध्यापक व शिक्षक घरी गेले होते. यावेळी सायंकाळी पाचच्या सुमारास शाळेतील पाठीमागील वर्गामधून धूर येत असल्याचे तेथील चौकात असलेल्या नागरिकांच्या लक्षात आले. यावेळी ग्रामस्थांनी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय चव्हाण यांना व शिरवळ पोलिसांना तातडीने घटनास्थळी बोलावले.
यावेळी ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून पाणी ओतून आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी शिरवळचे उपसरपंच उदय कबुले, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश परखंदे , प्रदीप माने, सुनील देशमुख , राहुल हाडके , सागर रवळेकर, रामदास किर्वे,शब्बीर पठाण, इकबाल शेख, ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी तातडीने शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे, हवालदार रवींद्र कदम, स्वप्नील दौंड, तलाठी निशांत जोशी यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, संबंधित अज्ञाताने शाळेमधील वर्गाच्या दरवाज्यांची कुलूप तोडत एका कपाटाला आग लावत दुसऱ्या वर्गातील कपाट उचकटले आहे. तर किचन रुम व वर्गातील साहित्य अस्ताव्यस्त केले आहे.
या घटनेची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत शिरवळ पोलीस स्टेशनला सुरु होते. (वार्ताहर)