व्यावसायिकाला पिस्तूलाचा धाक दाखवून स्कॉर्पिओ पळवली, साताऱ्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 03:51 PM2023-02-24T15:51:59+5:302023-02-24T16:09:44+5:30

पथके कोल्हापूर, सांगलीला रवाना...

Scorpio ran away after pointing a pistol at a businessman from Chakan, a shocking incident in Satara | व्यावसायिकाला पिस्तूलाचा धाक दाखवून स्कॉर्पिओ पळवली, साताऱ्यातील धक्कादायक घटना

व्यावसायिकाला पिस्तूलाचा धाक दाखवून स्कॉर्पिओ पळवली, साताऱ्यातील धक्कादायक घटना

googlenewsNext

सातारा : गाडी खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून चार लाखांची स्कॉर्पिओ पळवून नेल्याची धक्कादायक घटना दि. २१ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास साताऱ्यातील बाॅम्बे रेस्टाॅरंट चाैकात घडली. याप्रकरणी चारजणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नवनाथ नामदेव भुजबळ (३५, रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांचा गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. सोशल मीडियावर गाडी विक्रीची जाहिरात पाहून एका व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. स्कॉर्पिओ गाडीचा व्यवहार चार लाख दहा हजारांना ठरला. टोकन म्हणून त्या व्यक्तीने त्यांना दहा हजार रुपये पाठवले. उर्वरित पैसे तुम्ही साताऱ्यात गाडी घेऊन आल्यानंतर देतो, असे सांगितले. त्यानुसार भुजबळ हे दि. २१ रोजी रात्री साडेनऊ वाजता आपल्या तीन व्यावसायिक मित्रांसमवेत दोन गाड्या घेऊन साताऱ्यात आले. 

बाॅम्बे रेस्टाॅरंटजवळ हे सर्वजण त्यांना भेटले. गाडीची ट्रायल घेऊन येतो, असे सांगून त्यांनी गाडीची चावी घेतली. गाडीमध्ये भुजबळ यांचे दोन मित्र बसले. गाडी कोल्हापूरच्या दिशने ट्रायल घेण्यासाठी निघाली. गाडीचा वेग वाढवल्याने गाडीमध्ये बसलेल्या भुजबळ यांच्या मित्राला शंका आली. त्याने चालत्या गाडीतून उडी मारली, तर दुसरा व्यावसायिक मित्र गाडीतच बसला होता. त्याला पिस्तुलाचा धाक दाखवून गाडीतून खाली उतरवले. त्यानंतर गाडी कोल्हापूरच्या दिशेने सुसाट निघून गेली. या प्रकारानंतर व्यावसायिक नवनाथ भुजबळ यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

पथके कोल्हापूर, सांगलीला रवाना...

पिस्तूलचा धाक दाखवून स्कॉर्पिओ कोल्हापूरकडे गेली आहे. त्यामुळे दरोडेखोरांना पकडण्यासाठी सातारा पोलिसांची दोन पथके सांगली आणि कोल्हापूरला रवाना झाली आहेत. संशयितांचा थांगपत्ता पोलिसांना लागला असून, लवकरच त्यांना बेड्या ठोकल्या जातील, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Scorpio ran away after pointing a pistol at a businessman from Chakan, a shocking incident in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.