बारावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षेपूर्वीच सर्पदंशाने मृत्यू
By admin | Published: February 19, 2015 10:30 PM2015-02-19T22:30:05+5:302015-02-19T23:45:27+5:30
नायकाचीवाडी : झाडाखाली अभ्यास करताना काळाची झडप
वडूज : शेतातील झाडाखाली बारावीचा अभ्यास करताना सर्पदंश झाल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. परीक्षा दोन दिवसांवर आली असताना वडूजजवळील नायकाचीवाडी येथे गुरुवारी ही घटना घडली.कोमल दिलीप जाधव (वय १७, रा. नायकाचीवाडी, ता.खटाव) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. बुधवारी (दि. १८) ती निसळबेंद (वडूज) येथे राहत्या घरासमोर असणाऱ्या आंब्याच्या झाडाखाली अभ्यास करत होती. दुपारी अडीचच्या सुमारास तिच्या डाव्या पायाच्या करंगळीला साप चावला. तिला वडूज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, गुरुवारी प्रकृती खालावल्याने तिला सातारच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पहाटे पाचच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी दोन वाजता नायकाचीवाडी येथील स्मशानभूमीत कोमलवर अंत्यसंस्कार केले. (प्रतिनिधी)
शेतकरी कुटुंबातील हुशार मुलगी
दिलीप जाधव शेतकरी असून, त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. यातील कोमल प्राथमिक शाळेपासूनच हुशार होती. जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर तिचे काका महिमानगड, ता. माण येथे शिक्षक असल्याने त्यांनी तिला पुढील शिक्षणासाठी तिकडे नेले. दहावीत ८० टक्के गुण मिळविणारी कोमल नंतर वडूजच्या छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेजमध्ये दाखल झाली. हुशार कोमलच्या दुर्देवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.