नियमांचे उल्लंघन केल्यास दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:40 AM2021-05-13T04:40:27+5:302021-05-13T04:40:27+5:30
सातारा : अत्यावश्यक सेवेची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असताना शहरातील अनेक दुकाने, तसेच हॉटेल बाहेरून बंद व आतून सुरू ...
सातारा : अत्यावश्यक सेवेची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असताना शहरातील अनेक दुकाने, तसेच हॉटेल बाहेरून बंद व आतून सुरू ठेवली जात आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. यासाठी आठ कर्मचाऱ्यांच्या पथकाची नेमणूक केली असून, या पथकाने नियमांचे सातत्याने उल्लंघन करणारी शहरातील २५ दुकाने एकवीस दिवसांसाठी सील केली आहेत.
सातारा जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. संचारबंदी लागू करूनही कोरोना रुग्णवाढीचा वेग कमी झालेला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दि. १५ मे पर्यंत संचारबंदीचे निर्बंध अधिक कठोर केले आहेत. या कालावधीत अत्यावश्यक सेवेची दुकानेदेखील बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, या सेवा सकाळी ७ ते ११ या वेळेत घरपोच सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.
असे असताना शहरातील बहुतांश दुकानदार दिवसभर आपली दुकाने बाहेरून बंद व आतून सुरू ठेवत आहेत. हॉटेल व्यावसायिकांकडूनदेखील असाच प्रकार केला जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालिकेने नियामांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दुकान उघडी ठेवणाऱ्यांना प्रथम एक हजार, दुसऱ्यांदा तीन हजार रुपये दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, तर तिसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित दुकान व हॉटेल २१ दिवसांसाठी सील केले जाणार आहे. त्यामुळे दुकनदार व हॉटेल चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे काटेकोर पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.