अजिंक्यतारा किल्ल्यावर आढळला शॅमेलियन जातीचा सरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 11:57 PM2018-11-09T23:57:13+5:302018-11-09T23:59:15+5:30

अजिंक्यतारा किल्ल्यावर रंग बदलणारा सरडा शॅमेलियन आढळून आला. हा शॅमेलियन शाहूनगरमधील निसर्गमित्र अमोल कोडक यांच्या दृष्टीस पडला.

The Seaman of the Seaman found in Ajinkya Fort | अजिंक्यतारा किल्ल्यावर आढळला शॅमेलियन जातीचा सरडा

अजिंक्यताऱ्यावर अमोल कोडक यांनी घेतलेले शॅमेलियन सरड्याचे छायाचित्र.

Next
ठळक मुद्देसरडाच्या प्रजाती रक्षणासाठी प्रयत्न : निसर्गमित्र अमोल कोडक यांनी केला कॅमेराबंदरंग बदलणारा गिरगीट, हरण सरडा असे म्हणूनही ओळखले जाते. तो झाडावर राहतो, तर कधी-कधी आपल्या भक्ष्याच्या शोधार्थ रस्त्यांवर

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्यावर रंग बदलणारा सरडा शॅमेलियन आढळून आला. हा शॅमेलियन शाहूनगरमधील निसर्गमित्र अमोल कोडक यांच्या दृष्टीस पडला. हा सरडा वेळेनुसार आणि संकटसमयी आपला रंग बदलत असतो.

सातारा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या विविधतेने नटलेला आहे. यामध्ये नानाविध प्रजातीचे साप, पशुपक्षी सरपटणारे प्राणी या बरोबरच बिबट्यासारख्या वन्यजीवांचे वास्तव्य आहे. या परिसरात सध्या शॅमेलियन दर्शन देऊ लागला आहे. अमोल कोडक यांनी त्याला कॅमेराबद्ध केलं आणि ‘लोकमत’ला ते छायाचित्र उपलब्ध करून दिलं.
शॅमेलियन हा एक अतिशय शांत आणि बिनविषारी जीव आहे. असा रंग बदलणारा सरडा आपण कधीतरी पाहिला असतो नाहीतर त्याच्याबद्दल वाचलेलं असतं. हा प्राणी अर्थातच सरडा वर्गात मोडतो.

या सरड्याची माहिती मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे यांनी दिली. या सरड्याला रंग बदलणारा गिरगीट, हरण सरडा असे म्हणूनही ओळखले जाते. तो झाडावर राहतो, तर कधी-कधी आपल्या भक्ष्याच्या शोधार्थ रस्त्यांवर आढळून येतो. झाडावर चढताना झाडाचे खोड ज्या रंगाचे असेल तसा रंग बदलतो. कधी हिरवा, पिवळा, काळसर असे रंग बदलत राहतो. त्यामुळे त्याचे संरक्षण होते. या सरड्याची शेपटी लांब असते, त्यामुळे तो झाडाच्या फांदीला शेपटी गुंडाळून झोकेसुद्धा घेतो.

या सरड्याचं वेगळेपण अगदी त्याच्या दिसण्यापासूनच सुरू होतं. खडबडीत दिसणारं याचं शरीर दोन्ही बगलांकडून अगदी दाबून चपटं केल्यासारखं दिसतं. एकावर एक तीन शिरस्त्राण घातल्यासारखं दिसणारं याच डोकं, कडबोळ्यासारखी वळलेली शेपूट, शरीराला न शोभणारे लुकडे पाय नी ‘ज्युरासिक पार्क’ पिक्चरमधल्या डायनोसार्सची आठवण करून देणारा याचा जबडा असं त्याचं रुपडं असतं. शॅमेलियनची जीभ म्हणजे निसर्गातलं एक आश्चर्यच! त्याची जीभ त्याचे एकमेव अस्त्र आहे. या जिभेच्या जोडीला याचे डोळे निसर्गातलं दुसरं वैशिष्ट असतात. त्याचे डोळे तेल भरायच्या कोन नरसाळ्याप्रमाणे एका शंकूच्या टोकावर बसवलेले असतात. हे डोळ्याचे दोन्ही शंकू स्वतंत्रपणे वेगवेगळ्या दिशांना फिरू शकतात.

म्हणजे याचं भक्ष्य दिसलं की हा त्याचा अंदाज घेतो, सावकाश शरीर पुढच्या पायावर तोलून हळूच जबडा उघडून थोडीच जीभ पुढे काढून तयार राहतो. हे सगळं अगदी सावकाश सुरू असतं. मात्र नंतर एकाएकी आपल्यालाच काय, त्या भक्ष्यालापण कळत नाही की भक्ष्याची जागा शॅमेलियनच्या तोंडात कशी? याची आठ ते नऊ इंच लांब गुलाबीसर जीभ आपल्या चिकट टोकाने भक्ष्याला खेचून घेते. यालाच शॅमेलियनचं जीभ फेकणं नी परत आत घेणं म्हणतात. याच पद्धतीने मस्तपैकी किडे मकोडे, भुंगे, फुलपाखरं, मोठे मुंगळे मटकवून टाकतात.

या सरड्याला काही धावता येत नाही. त्यामुळे स्वत:चा बचाव करण्यासाठी जणू निसर्गानेच त्याला रंगबदलाचे वरदान दिले आहे. मग अर्थातच सरुपता म्हणजेच केमोफ्लोज होऊन सभोवतालच्या रंगानुरूप होणं! त्याच्या शरीरातल्या रंगपेशी मेंदूकडून आज्ञा आल्यावर शक्यतो हुबेहूब रंग धारण करायचा प्रयत्न करतात.

 

Web Title: The Seaman of the Seaman found in Ajinkya Fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.