विश्वाच्या उत्पत्तीचा शोध सुरूच
By admin | Published: November 23, 2014 12:32 AM2014-11-23T00:32:43+5:302014-11-23T00:33:37+5:30
जयंत नारळीकर : ‘लेखक तुमच्या भेटीला’ उपक्रमात केले मार्गदर्शन
सातारा : ‘विश्वाची उत्पत्ती कशी झाली आणि पृथ्वीपासून अवकाशात चाळीस किलोमीटर अंतरावर असलेले जीवाणू कुठून आले, याबाबत संशोधन सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्र हे देशातील प्रगत राज्य असले तरी इतर राज्यात स्वतंत्र विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विभाग आहे. परंतु महाराष्ट्रात असा स्वतंत्र विभाग नाही, ही खेदाची बाब आहे,’ असे मत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेतर्फे ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमाचा प्रारंभ येथे डॉ. जयंत नारळीकर व मंगला नारळीकर यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. किशोर बेडकिहाळ, रवींद्र बेडकिहाळ, नगराध्यक्ष सचिन सारस, शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, उद्योजक संतोष यादव, नगरसेवक अमोल मोहिते, डॉ. सचिन जाधव, अॅड. चंद्रकांत बेबले, डॉ. उमेश करंबळेकर, नगरसेवक प्रवीण पाटील, राजेश जोशी, सुभाष सरदेशमुख उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. तुम्हाला लहानपणी संशोधक व्हाल, असे वाटले होते का? या प्रश्नाला उत्तर देताना नारळीकर म्हणाले, ‘लहानपणी असे वाटले नव्हते; परंतु वडील गणिताचे प्राध्यापक होते. त्यामुळे आपणही त्यांच्यासारखे व्हावे, असे वाटे. जेव्हा वडिलांप्रमाणे मी केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेलो, त्यावेळी त्याकाळी विद्यापीठात शास्त्रज्ञ रायईल आणि शास्त्रज्ञ व्हाईल यांच्यात वाद सुरू होता. त्यावेळी मत मांडण्याची संधी मिळाली.’ विनोद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. नंदकुमार सावंत यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)