पतंगरावजी जाधवराव यांच्या समाधीचा शोध: चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्याशी सव्वातीनशे वर्षांनंतरही अस्तित्व टिकून,इतिहासाला उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 11:17 PM2018-06-29T23:17:53+5:302018-06-29T23:18:30+5:30

मराठ्यांच्या अनेक लढायांचा साक्षीदार असलेल्या चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या जांब-किकली गावात स्वराज्याचे सेनापती धनाजी जाधवराव यांचे थोरले पुत्र पतंगरावजी यांच्या समाधीचा शोध लागला

The search of Samarth Samarth of Pangaravaji Jadhavrao: Survival of history at the foot of Chandanvandan fort | पतंगरावजी जाधवराव यांच्या समाधीचा शोध: चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्याशी सव्वातीनशे वर्षांनंतरही अस्तित्व टिकून,इतिहासाला उजाळा

पतंगरावजी जाधवराव यांच्या समाधीचा शोध: चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्याशी सव्वातीनशे वर्षांनंतरही अस्तित्व टिकून,इतिहासाला उजाळा

googlenewsNext

सचिन काकडे ।
सातारा : मराठ्यांच्या अनेक लढायांचा साक्षीदार असलेल्या चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या जांब-किकली गावात स्वराज्याचे सेनापती धनाजी जाधवराव यांचे थोरले पुत्र पतंगरावजी यांच्या समाधीचा शोध लागला आहे. समाधी सव्वातीनशे वर्षांपूर्वी बांधल्याचे मत इतिहासप्रेमींनी व्यक्त केले.

चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्यास मोगल सरदार हमीदउद्दीन खानाच्या सैन्यासोबत सेनापती संताजी घोरपडे यांच्या तुकडीची लढाई झाली होती. यावेळी संताजी घोरपडे यांच्या सैन्यात असलेले पतंगरावजी जाधवराव मोगलांकडून मारले गेले. या युद्धाचे वर्णन सेतुमाधवराव पगडी अनुवादित, ‘मोगल दरबाराची बातमीपत्रे’ यात आढळते. ९ सप्टेंबर १६९५ रोजीच्या मोगल बातमीपत्रात ‘हमीदउद्दीन खानाने चंदनवंदन किल्ल्याखालच्या वाड्या जाळण्यासाठी फत्तेहुल्लाखान याला पाठविले होते. संताजी यांना ही बातमी समजली. ते फत्तेहुल्लाखानावर चालून आले.

हमीदउद्दीन खानही तेथे पोहोचला. युद्ध झाले. धनाजी जाधवांचा मुलगा, एक मराठा सरदार व अनेक काफर सैनिकांचा पराजय झाला. गनीम किल्ल्यात जाऊन बसले. खानाने किल्ल्याखालील पेठा जाळून टाकल्या व गुरेढोरे पकडली. या लढाईत धनाजी जाधवरावांचे पुत्र पतंगरावजी जाधवराव मारले गेले.’ असे नमूद केले आहे.जांबच्या पूर्वेस, कृष्णा मंदिरासमोरील बागेच्या विहिरीजवळ शेतात पतंगरावजी जाधवराव यांची समाधी आहे. बांधकामाची शैली जाधवराव घराण्याच्या इतर समाधीप्रमाणेच आहे. या समाधीचा शोध वीरगळ अभ्यासक अनिल दुधाने, इतिहास अभ्यासक दामोदर मगदूम-नाईक, अजय जाधवराव, राजनरेश जाधवराव, रमेश चंदनकर तसेच जामचे इतिहासप्रेमी संकेत बाबर यांच्या प्रयत्नाने लागला.

जिजाऊंचे खापर पणतू
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ यांचे धनाजी जाधवराव हे पणतू तर पतंगरावजी जाधवराव हे खापर पणतू होत. छत्रपती राजाराम महाराज यांनी धनाजी जाधवराव यांना ‘जयसिंगराव’ हा किताब बहाल केला. स्वराज्यासाठी बलिदान देणारे जाधवराव घराण्यातील शंभूसिंह जाधवराव पहिले तर पतंगरावजी हे दुसरे शूर वीर होत.
 

चारही बाजूला पुष्पवेलीची कमान
या समाधीवर जाधवराव घराण्याच्या समाधीवर प्रामुख्याने आढळणारी शरभशिल्प, मयूरशिल्प, गजशिल्प ही चिन्हे आढळतात. समाधीच्या चारही बाजूला पुष्पवेलीची कमान तसेच शिवलिंगही आहे. या समाधीची लांबी १५.५ फूट, उंची ३.५ फूट तर रुंदी १४.५ फूट आहे. धनाजी जाधवराव यांच्या इतर तीन पुत्रांची समाधी चंद्रसेन जाधवराव (भालकी), संताजी जाधवराव (मांडवे, सातारा), शंभूसिंग जाधवराव (माळेगाव) येथे आहेत.
 

वंशज महाराष्ट्रात विस्थापित...
दौलताबाद किल्ल्यावर दरबारात निजामाने फितुरीने लखुजी जाधवराव, त्यांचे पुत्र अचलोजी, रघुजी व नातू यशवंतराव यांची हत्या केल्याची इतिहासात नोंद आहे. या घटनेनंतर जाधवराव कुटुंबीय महाराष्ट्रात ठिकठिकाणी विस्थापित झाले. त्यामुळे जाधवराव घराण्यातील पराक्रमी वीरांच्या समाध्या महाराष्ट्रात सिंदखेडराजा, किनगावराजा,देऊळगावराजा, उमरद रसूमचे, जवळखेड, पैठण, निलंगा, ब्रह्मपुरी, माळेगाव बुद्र्रुक, वाघोली, भुर्इंज, पेठवडगाव ठिकाणी आढळतात.
 

गेल्या अनेक वर्षांपासून विरगळींचा अभ्यास करीत असतानाच चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्याशी एक समाधी आढळून आली. यानंतर इतिहासातील दाखले घेऊन महाराष्ट्रातील काही समाधींची प्रत्यक्षात पाहणी केली. अनेक बाबतीत साधर्म्य आढळल्यानंतर ही समाधी पतंगरावजी जाधवराव यांची असल्याचे स्पष्ट झाले. या ऐतिहासिक वास्तूचे जतन होणे गरजेचे आहे.
- अनिल दुधाने, (विरगळ अभ्यासक)

चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या जांब येथे पतंगरावजी जाधवराव यांची समाधी आढळली.

Web Title: The search of Samarth Samarth of Pangaravaji Jadhavrao: Survival of history at the foot of Chandanvandan fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.