दिवसभर घामाच्या धारा... रात्री पावसाच्या गारा
By admin | Published: March 31, 2017 10:57 PM2017-03-31T22:57:28+5:302017-03-31T22:57:28+5:30
खटाव, कोरेगावात पाऊस; साताऱ्यातही मुसळधार
सातारा : साताऱ्याचे तापमान शुक्रवारी दिवसभर ३८ अंश सेल्सिअस होते. दुपारी तीननंतर काळे ढग जमा झाले अन् रात्री सातच्या सुमारास पावसाच्या सरी सुरू झाल्यानंतर तापमान ३५ अंशांवर आले. रात्री गारांबरोबरच मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानंतर पारा आणखी खाली घसरून २२ अंशावर स्थिरावला. खटाव, कोरेगाव तालुक्यांतही दमदार पाऊस झाला.
साताऱ्यासह जिल्हा कडक उन्हामुळे तापलेला असल्याने नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागलेल्या असतानाच शुक्रवारी सायंकाळी खटाव, कोरेगाव तालुक्यात, तर रात्री सातनंतर साताऱ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
खटाव : गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या खटाव ग्रामस्थांना शुक्रवारी सायंकाळी पडलेल्या अवकाळी पावसानेदिलासा मिळाला. दुपारी तीनपासूनच काळ्या ढगांनी आभाळ भरून येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे हवेत अधिकच उष्मा जाणवत होता. सायंकाळी साडेचारच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटामध्ये पावसाला सुरुवात झाली. सुमारे पाऊण तास पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी साठले होते. तालुक्यातील चौकीचा आंबा परिसरातील अंबेरी येथे सुमारे दीड तास मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतात पाणी साठले होते, तर ओढे, नाले तुडुंब भरून वाहत होते. अचानक झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची पळापळ झाली. उन्हाळ्यात पडलेला पहिलाच पाऊस असल्याने लहान मुले व तरुणांनी पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला.
सातारा तासभर अंधारात
साताऱ्यात दुपारी तीनपासून काळे ढग जमा झाले होते. रात्री सातच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला. सुमारे तासभर संपूर्ण शहर अंधारात होते. रात्री आठला विद्युत पुरवठा सुरळीत झाला.
कांदा झाकण्यासाठी गडबड
खटाव परिसरात दुपारी सुटलेल्या जोरदार वाऱ्यामुळे काहीकाळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता, तर शेतात काम करणाऱ्या मजुरांची एकच तारांबळ उडाली होती. कांदा काढणीची लगबग सुरू असल्याने कांदा सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची गडबड झाली.
फोटो ३१ सातारा ०१
खटाव येथे शुक्रवारी सायंकाळी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने भिजवले. कडक उन्हामुळे हैराण झालेल्या लहान मुलांनी पावसात खेळण्याचा आनंद घेतला.