आला हंगाम.. खतांच्या किंमतीनं फोडला घाम!
By Admin | Published: May 29, 2015 09:51 PM2015-05-29T21:51:41+5:302015-05-29T23:56:25+5:30
कुणाचेच नाही नियंत्रण : खरीपाच्या तोंडावर भाववाढ झाल्याने शेतकऱ्यांत नाराजी
परळी : यंदा सातारा तालुक्यासह परळी परिसरात ऊस उत्पादनात वाढ झाल्याने बळीराजा ऊसपीक भरणीच्या कामात गुंतला असून खतांची मागणी वाढली आहे. याचा फायदा घेऊन रासायनिक खतनिर्मिती करणाऱ्या कंपन्या, दुकानदार यांनी ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर खतांचे दर भरमसाठ वाढविल्याने शेतकऱ्यांच्यात नाराजी परसली आहे. वाढीव दरामध्ये शासनाचे नियंत्रण नसल्याने कंपन्यांचे फावत असल्याचा आरोप होत आहे.दरवर्षीच खरीप व रब्बी हंगामात हंगामानुसार लागणाऱ्या रासायनिक खतांच्या दरात वाढ होत असली तरी अलीकडे कंपन्यांचे धोरण बदलले आहे. पंधरा दिवसांच्या टप्प्यांनी दरवाढ सुरू ठेवली आहे. दरवाढीचे निकष काय, कोणत्या कारणांमुळे दरवाढ झाली. याचे उत्तर मात्र कंपन्या व शासकीय यंत्रणेकडून शेतकऱ्यांना देण्यात येत नाही.खरीपात सोयाबीन, भुईमूग, ज्वारी तर रब्बीत गहू, हरभरा, कांदा यांसह भाजीपाला घेतला जातो. महत्त्वाचे म्हणजे खरीपापासूनच शेतीला खऱ्या अर्थाने सुरूवात होते. हाच हंगाम या व्यवसायात महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे पाऊस सुरू होण्यापूर्वी ऊसाला खतांचा डोस द्यावा लागतो. सध्या विक्रेत्यांकडे खतांची मागणी वाढली आहे. याचाच फायदा घेऊन कंपन्यांनी किंमत वाढीचे धोरण स्वीकारले आहे. सध्या रासायनिक खताचे पन्नास किलोचे पोते खरेदी करावयाचे झाल्यास शेतकरीवर्गाला अर्ध्या टनाइतके पैसे मोजावे लागत आहेत. वारंवार होणाऱ्या खत दरवाढीवर सरकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जाब कोणाला विचारायचा, हा प्रश्न उपस्थित होत आहे. ऊस अथवा कोणत्याही पिकासाठी एकरी खताची मात्रा द्यायची झाल्यास किमान वेगवेगळ्या प्रकारच्या ८ ते १० रासायनिक खतांची आवश्यकता भासते. सध्याचे दर पाहता एकरी १० पोती लागणाऱ्या ठिकाणी केवळ चार ते पाच पोत्यांचीच मात्रा शेतकरीवर्गाकडून दिली जात आहे. सध्या बाजारपेठेत युरिया खताच्या ५० किलो पोत्याचा दर ३३० ते ३५०, सुफला ९०० रूपये, अमोनियम सल्फेट ६५०, पोटॅश ८६०, डीएपी १२९० रूपये दर आहे. महिन्यापूर्वी असलेल्या मूळ दरात वाढ झाली आहे. कंपन्यांनी दरवाढ केल्याने ज्या किरकोळ विक्रेत्यांकडे पूर्वीच्या कमी दराचा कोटा शिल्लक आहे त्याची नवीन आणि जास्त दराने विक्री केला जात आहे. याकडे कृषी खातेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते आहे. मात्र, शेतीची घात चुकवून चालत नाही. यासाठी मुकाट्याने आहे त्या दराने शेतकरी खताची खरेदी करत आहेत. (वार्ताहर)
पंधरा दिवसांच्या टप्प्यांनी दरवाढ सुरू
दरवाढीची कारणे गुलदस्त्यात
शासकीय यंत्रणा चिडीचूप
विक्रेत्यांकडे खतांची मागणी वाढली
जाब कोणाला विचारायचा? या चिंतेत शेतकरी
कृषी खात्याचेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष
रासायनिक खत आवश्यक
शेतकरीवर्गाकडून कुठल्याही पिकाचे उत्पादन घेतल्यानंतर शेणखताची मात्रा हंगामानुसार दिली जाते. याशिवाय ऊसाला पाला-पाचोळा न पेटवता तो जमिनीत तसाच ठेवून सेंद्रिय खताची मात्रा दिली जाते. परंतु केवळ या खतामुळे जमिनीचा पोत सुधारावा यासाठी शेणखताबरोबरंच रासायनिक खतांचीही मात्रा दिली जाते.