६० हजार हेक्टरवरील पिकाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण-सातारा अन् सांगलीचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 01:19 AM2018-03-09T01:19:13+5:302018-03-09T01:19:13+5:30
सातारा : टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत सातारा आणि सांगली जिल्ह्यातील सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक मोजणीसाठी प्रथमच ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जातआहे.
नितीन काळेल ।
सातारा : टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत सातारा आणि सांगली जिल्ह्यातील सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक मोजणीसाठी प्रथमच ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जातआहे. कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत प्रायोगिक तत्वावर राज्यात हे प्रथमच पाऊल उचलण्यात आले असून, ५० जणांची टीम सक्रिय झाली आहे. या प्रयोगामुळे महसुलात वाढ होऊन प्रकल्प सुरळीत चालण्यास मदत होणार आहे.
टेंभू उपसा सिंचन योजना ही खºया अर्थाने दुष्काळी तालुक्यांसाठी वरदान ठरणारी आहे. या योजनेतून सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतीपिकाला पाणी मिळते. ही योजना सुरळीत चालणे व महसुलात वाढ होण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळेच टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभागांतर्गत सातारा आणि सांगली जिल्ह्यातील सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक मोजणी ड्रोन सर्वेक्षणाद्वारे दि. ५ मार्चपासून सुरू झाली आहे. यामुळे पीक मोजणी संदर्भातील तक्रारी संपुष्टात येणार आहेत. पीक क्षेत्राची अचूक नोंद होऊन वेळेत पाणीपट्टी वसूल होणार आहे. तसेच हा प्रकल्पही चांगल्यारितीने चालवता येणार आहे. त्यामुळे ड्रोनद्वारे पीक मोजणीचा प्रायोगिक तत्वावरील हा प्रयोग महसुलातही भरीव वाढ करणारा ठरणार आहे. या पहिल्या टप्प्यात सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पीक क्षेत्राची मोजणी करण्यात येणार आहे. मार्चअखेरपर्यंत हे काम संपविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील सुमारे २० हजार हेक्टर पीक मोजणी ही पुढील वर्षी करण्यात येणार आहे.
ड्रोनकडून ८ चौरस किलोमीटरची मोजणी...
एक ड्रोन आवकाशात सोडल्यावर एका उड्डाणामध्ये ८ चौरस किलोमीटर क्षेत्राची पाहणी करून त्याचे रेकॉर्डिंग करून ठेवणार आहे. एका दिवसात एक ड्रोन सुमारे ३० चौरस किलोमीटर इतके क्षेत्र कव्हर करणार आहे. सध्या तीन ड्रोनद्वारे मोजणीचे काम सुरू आहे. कृष्णा, कोयना नदी, कृष्णा कालवा, आरफळ कालवा, टेंभू सिंचन क्षेत्राची मोजणी होणार आहे.
टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत सातारा आणि सांगली जिल्ह्णांतील सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्राची पीक मोजणी करण्यात येणार आहे. यामुळे पिकाचे क्षेत्र अचूक समजून महसुलातही वाढ होणार आहे. तसेच हा प्रकल्प चांगला चालून शेतकºयांना सोयीसुविधा पुरवता येणे शक्य होणार आहे.
- राजन रेड्डीयार, कार्यकारी अभियंता टेंभू प्रकल्प