Satara: महाबळेश्वर गारठला, हंगामातील निचांकी तापमानाची नोंद; किती अंशावर आलं तापमान..जाणून घ्या
By नितीन काळेल | Published: November 29, 2024 07:12 PM2024-11-29T19:12:23+5:302024-11-29T19:13:14+5:30
जनजीवनावर परिणाम: सातारा शहरात १२ अंशाची नोंद
सातारा : जिल्ह्यातील किमान तापमानात आणखी उतार आला असून, शुक्रवारी महाबळेश्वरात १०.५, तर सातारा शहरात १२ अंशाची नोंद झाली आहे, हे या हंगामातील आतापर्यंतचे नीचांकी तापमान ठरले आहे. पारा खालावल्याने जिल्ह्यातील गारठ्यात चांगलीच वाढ झाल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे.
जिल्ह्यात दरवर्षी डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी पडते. साधारणपणे डिसेंबरचा मध्य ते जानेवारीची सुरुवात यादरम्यान पारा एकदम खाली येतो. पण, यंदा नोव्हेंबर महिन्यातच कडाक्याच्या थंडीला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे मागील १५ दिवसांत थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच सध्या दररोज पारा घसरत चालला आहे. त्यामुळे चार दिवसांत किमान तापमानात दोन अंशाचा उतार आला आहे.
सातारा शहरात थंडीचे प्रमाण वाढले आहे. गुरुवारी १२.५ अंश किमान तापमानाची नोंद झाली हाेती. पण, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास शहरात १२ अंशाची नोंद झाली. त्यातच वातावरणात शीतलहर आहे. त्यामुळे अंगाला थंडी झोंबत असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरचा पाराही घसरला आहे. शुक्रवारी १०.५ अंशाची नोंद झाली. हे या हंगामातील नीचांकी तापमान ठरले. आणखी दोन दिवस तापमानात उतार राहिला तर महाबळेश्वरात दवबिंदू गोठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्याच्या अनेक भागातील किमान तापमान १३ अंशाच्या दरम्यान आहे. यामुळे थंडीत वाढ झाली आहे. सायंकाळी सहानंतरच थंडीला सुरुवात होते. रात्रभर थंडीची तीव्रता जाणवते, तर पहाटेच्या सुमारास थंडीचा कडाका पडत आहे. यामुळे सकाळी १०:०० वाजले तरी अंगातून थंडी जात नाही. तसेच दुपारच्या सुमारासही वाऱ्यामुळे थंडी जाणवते. या थंडीमुळे बाजारपेठ तसेच शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. थंडीमुळे गावोगावी आणि शहरातही शेकोट्या पेटविण्यात येत आहेत.