विश्रांतीकडून ऋतूजा संकपाळ चितपट

By admin | Published: March 27, 2016 09:32 PM2016-03-27T21:32:36+5:302016-03-28T00:17:07+5:30

शेणोलीत कुस्त्या : सत्तरहून अधिक लढती; शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले

Seatuja Sankhar Chitap from the rest | विश्रांतीकडून ऋतूजा संकपाळ चितपट

विश्रांतीकडून ऋतूजा संकपाळ चितपट

Next

कऱ्हाड : शेणोली, ता. कऱ्हाड येथे कलाई देवीच्या यात्रेनिमित्त झालेल्या निकाली कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची संभाजी कळसे विरुद्ध सुदेश ठाकूर यांची कुस्ती बरोबरीत सुटल्याने शौकिनांची निराशा झाली. मात्र मैदानावर विश्रांती पाटील व दिशा कारंडे यांनी निकाली कुस्त्या केल्यामुळे उपस्थितांच्या डोळ्यांचे अक्षरक्ष: पारणे फिटले. कुस्त्या पाहण्यासाठी दिग्गज व पंचक्रोशीतील कुस्ती शौकिनांनी मैदान खचाखच भरले होते. पलूसचे तहसीलदार मधुसुदन बर्गे, मोटार वहान निरीक्षक चैतन्य कणसे, हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ, महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान धनाजी पाटील-आटकेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
लहान गटामधील कुस्त्या संपल्यानंतर मैदानाचे आकर्षण असलेल्या महिला कुस्त्या पुकारण्यात आल्या. कोल्हापूरची विश्रांती पाटील विरुद्ध अहमदनगरची ऋतूजा संकपाळ यांच्यातील लढतीस प्रारंभ झाला. या कुस्तीमध्ये दोघींनीही आपआपली ताकद आजमावत डावपेच सुरू केले. एकमेकींवर पकड मिळवत असताना विश्रांतीने अचानक ऋतूजावर कब्जा घेत तिच्यावर एकेरी पटाच्या डावावर विजय मिळवला. तर पुणेतील उर्मिला पाटील विरुद्ध कोल्हापूरची दिशा कारंडे यांचीही लढत प्रेक्षकांना चांगलीच भावली. सुरुवातीला आक्रमक असणाऱ्या उर्मिलाला दिशाने काही क्षणातच लाटणं डावाच्या पकडीवर चितपट केले. या कुस्त्या पाहण्यासाठी मैदानात महिला प्रेक्षकांनीही हजेरी लावली होती. प्रेक्षणीय कुस्त्यांमध्ये आटकेतील संग्रामसिंह पाटील, शेणोलीतील अभिजित महाजन यांच्या निकाली कुस्त्या झाल्या. त्यानंतर मुख्य सहा कुस्त्यांच्या लढतींना प्रारंभ झाला. यामध्ये शेणोलीतील आकाश महाजन, रेठरे बुद्रुकचा सागर सावंत, कार्वेचा अजय थोरात, अंतवडीचा विनोद शिंदे, इंदोलीचा नयन निकम यांनी निकाली कुस्त्या करत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. आकाश महाजनने अवघ्या दोन मिनिटांमध्ये बजरंग पाटलावर विजय मिळविल्यामुळे शौकिनांनी आकाशवर बक्षिसांची अक्षरक्ष: बरसात केली. समालोचन सुरेश जाधव यांनी केले. त्यांना प्रकाश कणसे, सुनील कणसे व तानाजी चवरे यांनी साथ दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Seatuja Sankhar Chitap from the rest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.