वॉटर कपसाठी बिचुकले दुसऱ्यांदा मैदानात..

By admin | Published: April 17, 2017 11:21 PM2017-04-17T23:21:01+5:302017-04-17T23:21:01+5:30

दररोज चारशे जणांचे श्रमदान : पाण्यासाठी राजकारण बाजूला सारून गाव एकजुटीने कामाला; पाणीदार गावासाठी प्रयत्न

For the second time in the field for a water cup | वॉटर कपसाठी बिचुकले दुसऱ्यांदा मैदानात..

वॉटर कपसाठी बिचुकले दुसऱ्यांदा मैदानात..

Next



संजय कदम ल्ल वाठार स्टेशन
गावाअंतर्गत राजकारण बाजूला ठेवून कोरेगाव तालुक्यातील बिचुकले येथील ग्रामस्थ जलयुक्त चळवळीतून गाव पाणीदार करण्यासाठी पुन्हा एकदा एकवटले आहेत. गतवर्षी केलेल्या कामामुळे गावच्या पाणीसाठ्यात झालेली वाढ कायम ठेवण्यासाठी या गावाने दुसऱ्यांदा वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. याची सुरुवातच गावच्या यात्रेचा निधी जलयुक्तच्या कामासाठी वळवून केली आहे. आज पुन्हा नव्या जोमाने जलयुक्त कामाचा संकल्प आराखडा बनवत या गावातील चिमुकल्यांपासून ते आबालवृद्धापर्यंत दररोज
किमान चारशे लोक श्रमदान करत आहेत.
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागातील साधारण १,५३५ लोकसंख्येचे बिचुकले हे एक छोटंस गाव. मागील तीन ते चार वर्षांपर्यंत दुष्काळाशी लढा देत होते. गावच्या तिन्ही बाजूस डोंगररांगा असल्याने या गावाचा पाणीप्रश्न कायमच बिकट होता. उन्हाळ्यात कायम टँकरद्वारे गावास पाणी प्यावे लागत होते. हा एकच प्रश्न या गावकऱ्यांना सतावत होता. तर गावच्या शिवेवर आपल्यापेक्षाही बिकट असलेली नलवडेवाडी पाण्याबाबत मात्र सबल होती.
या गावाने केलेले पाणीदार काम आपण का करू नये, असा प्रश्न बिचुकले ग्रामस्थांना सतावत होता. शेवटी गावच्या काही युवक नेत्यांनी गावातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी एक बैठक घेतली. त्यासाठी डॉ. अविनाश पोळ यांच्यासारख्या लोकांचे मार्गदर्शन मिळाले आणि यातून गावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ‘श्रमदान ग्रुप’ नावाची एक संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून मागील दोन वर्षांत शेजारील डोंगरातील पाणी अडवण्यासाठी छोटे बंधारे बांधण्यात आले आहेत.
गतवर्षी आमिर खान, अंबानी यांच्या ‘पाणी’ फाउंडेशनच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धा जाहीर झाली. या स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्धार बिचुकले गावाने केला आणि स्पर्धेच्या कालावधीत संपूर्ण गाव, विविध संस्था, शासकीय अधिकारी, कलाकारांनी या गावात येऊन श्रमदानातून गावचा उत्साह वाढवला. यातून अनेक ठिकाणी पाणी अडवण्याचे काम झाले. गाव परिसरातील जुने पाझर तलावांचे खोलीकरण रुंदीकरण झाले. याचा परिणाम म्हणून आज या गावाला दररोज गरजेइतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
चालूवर्षी पुन्हा एकदा नव्या जोमाने अधिक गतीने हे गावकरी वेगवान झाले आहेत. प्रत्येक घरातील एक माणूस आज श्रमदानासाठी बाहेर पडत आहे. चालूवर्षी तारमाळ ते गुजरवाडी या दोन तलावांतील साडेसहा किलोमीटरमधील संपूर्ण ओढ्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे.
या दरम्यान या ओढ्यात आतापर्यंत १२ कोल्हापूर पद्धतीचे सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. तर चालू वर्षात नवीन २ अशा १४ सिमेंट बंधाऱ्यांत पाणीसाठा होणार आहे. यामाध्यमातून जवळपास ९,२०० घनमीटर काम श्रमदानाच्या माध्यमातून तर १ लाख घनमीटर काम हे यांत्रिकी विभागाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा या ग्रामस्थांचा मनोदय आहे.
लोकसंख्येएवढे खड्डे काढून वृक्षारोपण...
याशिवाय संपूर्ण गावात शोषखड्डे व गावच्या सर्व शेतजमिनीचे माती परीक्षण, सेंद्रिय खताद्वारे शेती व्यवस्थापन, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प साकारण्यात येणार आहे. गावच्या लोकसंख्येएवढे खड्डे काढून या खड्ड्यात प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे पालकत्व स्वीकारण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय शेतीच्या उतारावर बांध बंदिस्तीचे मोठे काम श्रमदानातून होणार आहे. यासाठी आता हे सारं गाव कामाला लागलं आहे. गावच्या या कार्यात शासनाच्या कृषी विभागाची मोठी मदत होणार आहे.

Web Title: For the second time in the field for a water cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.