सातारा जिल्ह्यात थंडीचा दुसरा बळी-: घरी न परतल्याने शोध, आंबेघर फाट्याजवळ मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 11:22 PM2019-01-01T23:22:37+5:302019-01-01T23:23:18+5:30
जावळी तालुक्यातील विवर येथे राहणाऱ्या एका वृद्धाचा थंडीने गारठून मृत्यू झाला. शामराव लक्ष्मण गोळे (वय ६५) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना सोमवारी
पाचगणी : जावळी तालुक्यातील विवर येथे राहणाऱ्या एका वृद्धाचा थंडीने गारठून मृत्यू झाला. शामराव लक्ष्मण गोळे (वय ६५) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री आंबेघर फाटा येथे घडली असून, जिल्ह्यात थंडीमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दोनवर गेली आहे.
याबाबत करहर दूरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की, विवर (ता. जावळी) येथे राहणारे शामराव गोळे सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेले होते. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधा-शोध सुरू केली. मात्र, ते कोठेही आढळून आले नाही. दरम्यान, पाचवड-पाचगणी मार्गावर असलेल्या आंबेघर फाटा बसस्टॉपजवळ त्यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच करहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मेढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मद्यप्राशन केल्याने व थंडीने गारठल्याने शामराव गोळे यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. नववर्षाच्या प्रारंभीच शामराव गोळे यांचा मृत्यू झाल्याने गोळे कुटुंबीयावर शोककळा पसरली आहे.
या घटनेची फिर्याद महादेव गोळे यांनी करहर पोलीस दूरक्षेत्रात दिली असून, अधिक तपास ठाणे अंमलदार डी. जी. शिंदे करीत आहेत. म्हसवड येथील शेतकरी महादेव केवटे यांचाही काही दिवसांपूर्वी थंडीने गारठून मृत्यू झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात थंडीमुळे गेलेल्या बळींची संख्या दोनवर गेली आहे.
साताºयाचा पारा ९.४ अंशांवर
शेकोट्या पेटल्या : किमान तापमान खालावल्याने गारठा कायम
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका असून, गेल्या तीन दिवसांपासून तर किमान तापमान ९.४ अंशांवर कायम स्थिर आहे. सततच्या या थंडीमुळे ग्रामीण भागातील गावोगावी शेकोट्या पेटत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्यावर्षीपेक्षा यंदा थंडीला लवकर सुरुवात झाली. दिवाळीच्या सणापासूनच थंडीला प्रारंभ झाला. त्यानंतर हळूहळू थंडीत वाढ होऊन १५ नोव्हेंबरच्या सुमारास यावर्षी प्रथमच साताºयातील किमान तापमान १३.४ अंशापर्यंत खाली आले होते. तर ११ डिसेंबरला किमान तापमान कमी होऊन ९.५ अंश नोंदले गेले. यामुळे एकदमच थंडीची लाट निर्माण झाली. तर यावर्षीचे आतापर्यंतच सर्वात कमी तापमान ९ अंश नोंदले गेले आहे. तर गेल्या काही दिवसांपासून हुडहुडी भरून येत आहे. थंडीची तीव्रता असून, थंड वारेही वाहत आहेत. यामुळे वातावरणात एकप्रकारची थंड लहर जाणवत आहे.
शनिवारी तर किमान तापमान ९.१ अंशावर होते. तर रविवारी ९.४ होते. सोमवार आणि मंगळवारीही साताºयात किमान तापमान ९.४ अंश नोंदले गेले. सतत तापमान १० अंशाच्या आसपास राहिल्याने गारठा वाढला आहे. यामुळे शेतीच्या कामावरही परिणाम झाला आहे. लोकांना उबदार कपडे घातल्याशिवाय बाहेर पडता येत नाही, अशी स्थिती आहे.